संगमनेर शहर पोलिसांची ‘दमदार’ कारवाई! महिलेवर अत्याचार करुन खून करणार्‍याला अवघ्या 48 तासांतच केले गजाआड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शारीरिक संबंधाच्या कारणातून बळजोरी करुन वेडसर महिलेवर अत्याचार करणार्‍या व त्यानंतर तिचा खून करुन मृतदेहावरही बलात्कार करणार्‍या आरोपीला संगमनेर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी मूळचा छत्तीसगडमधील असून हाती कोणताही दुवा नसतानाही शहर पोलिसांनी अतिशय कसोशीने तपास करीत अवघ्या 48 तासांतच घुलेवाडीतील खूनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी रायपूर येथील रुपचंद वर्मा याला बुधवारी संध्याकाळी कोपरगावातून अटक करण्यात आली आहे. संगमनेर शहर पोलिसांनी केलेल्या या दमदार कारवाईचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.22) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घुलेवाडी शिवारातील कामगार वसाहतीच्या मागील बाजूच्या सेप्टीक टँकमध्ये एक मृतदेह असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक पंकज शिंदे, निकीता महाले यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळाकडे धाव घेत सदरचा मृतदेह बाहेर काढला. सदरचा मृतदेह विवस्त्र व जवळजवळ कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे अवघड होते. मात्र संबंधित महिलेच्या हातावर निर्मला मर्द बंसीलाल असे नाव कोरलेले असल्याची बाब पोलिसांच्या नजरेत आली. त्यासोबतच खून झाल्याच्या ठिकाणाहून काही अंतरावर पोलिसांना ‘त्या’ महिलेचे कपडे, एक शॉल, कांदा कापण्याची सुरी, लाकडी दांडा व पुरुषाची एका पायाची चप्पल पोलिसांना आढळली. याशिवाय अन्य कोणताही दुवा नसल्याने या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहीले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी सदर प्रकरणाचा तपास शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याकडे सोपविला. त्यांनी घटनास्थळापासून आसपासच्या हॉटेल्स व धाब्यांवर जावून आरोपीचा तपास लावण्याचा प्रयत्न केला. या चौकशीतून घटनास्थळापासून जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये तशाच प्रकारची सुरी आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी संबंधित हॉटेलच्या मालकाकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उत्तरे देण्यास टाळाटाळ केली, मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने घटनास्थळी सापडलेली सुरी आणि शॉल दोन्हीही आपल्याच असल्याचे सांगत हॉटेलमध्ये काम करणारा रुपचंद वर्मा हा कामगार 5 नोव्हेंबरपासून अचानक बेपत्ता झाल्याची गोष्ट पोलिसांना सांगितली.

मृतदेह सापडल्याच्या अवघ्या दोन तासांतच पोलिसांनी आरोपीची ओळख समोर आणली खरी मात्र, सदर कामगार कोठे राहतो, कोठून आला याबाबत हॉटेल मालकालाही माहिती नसल्याने मोठा पेच निर्माण झाला. मात्र पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करण्याचा चंग बांधून हाती काही लागते का याचा कसून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सुमारे सात वर्षांपूर्वी संबंधित हॉटेल मालकाने ‘त्या’ कामगाराला ‘ऑनलाईन’ पैसे पाठविल्याची बाब समोर आली आणि पोलिसांच्या हाती तपासाचा मुख्य बिंदूच लागला. त्यावरुन तांत्रिक तपासात माहीर असलेल्या पोलीस नाईक फुरकान शेख यांनी आरोपीचा माग काढला आणि त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पो.उपनिरीक्षक पंकज शिंदे, पो.कॉ.साईनाथ तळेकर व पो.कॉ.अमृत आढाव यांनी थेट छत्तीसगडमध्ये जावून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचे घर गाठले. मात्र तेथे गेल्यावर आरोपी लहानपणापासूनच महाराष्ट्रात असल्याची माहिती त्यांना मिळाली, मात्र त्याचवेळी 7 नोव्हेंबर रोजी आरोपीचा भाचा प्रवीण वर्मा याने त्याला ऑनलाईन तीन हजारांची रक्कम पाठविल्याचे सांगितले.

सदरची माहिती पोलीस निरीक्षक देशमुख यांना देवून छत्तीसगडला गेलेले पथक माघारी फिरले. या दरम्यान पोलिसांनी मिळालेल्या माहितीची तांत्रिक पडताळणी केली असता सदर आरोपीला ऑनलाईन प्राप्त झालेली रक्कम कोपरगावातील बाबासाहेब काशिनाथ चौधरी यांच्या मोबाईलवरुन पाठविण्यात आल्याचे समोर आले. या दरम्यान छत्तीसगड येथे गेलेले पथक वैजापूर (जि.औरंगाबाद) येथे पोहोचले असता आरोपीचा भाचा प्रवीण वर्मा याने उपनिरीक्षक शिंदे यांना फोनद्वारे आरोपीने चौधरी यांच्यामार्फत पुन्हा एक हजार रुपयांची मागणी केल्याचे त्यांना कळविले, त्यानुसार त्याला किमान तासभर कोपरगाव येथे थांबविण्यास सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पूर्वी शहर पोलीस ठाण्यात सेवा बजावलेले व सध्या कोपरगाव येथे असलेले पो.ना.संदीप बोठे यांना याबाबतची माहिती व संपूर्ण पत्ता देत तेथे जावून आरोपीला ताब्यात घेवून पाठीमागून येणार्‍या तपास पथकाकडे सोपविण्याची सूचना त्यांना केली. त्यासोबतच त्यांनी पो.ना.अमित महाजन व पो.ना.विजय पवार या दोघांनाही कोपरगावच्या दिशेने रवाना केले.

पो.ना.बोठे यांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर काही वेळातच तपास पथक कोपरगाव पोलीस ठाण्यात पोहोचले व त्यांनी आरोपीचा ताबा घेत संगमनेर गाठले. त्याला विश्वासात घेवून पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केली असता त्याने खूनाची कबुली देत ‘त्या’ दिवशी घडलेला घटनाक्रम पोलिसांसमोर मांडला. त्यानुसार दिवाळीच्या दिवशी (4 नोव्हेंबर) सदरची वेडसर महिला संबंधित हॉटेलच्या परिसरात फिरत असल्याचे आरोपीने पाहिले व त्याच्या मनातील विकृती जागी झाली. हॉटेल मालकाला जेवणाचा डबा पोहोच केल्यानंतर त्याने मद्यसेवन केले व तो त्या महिलेकडे जावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करु लागला. मात्र त्यासाठी ती तयार होत नसल्याने आसपास कोणी नसल्याचे पाहून आरोपीने तिला फरफटत कामगार वसाहतीच्या मागील बाजूच्या मोकळ्या पटांगणात नेले.

तेथे सुरुवातीला तिच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार करुन त्याने तिला बेशुद्ध केले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने सोबत नेलेल्या कांदा कापण्याच्या सुरीने तिचा गळा चिरुन खून केला व त्यानंतरही त्याने मंतदेहावर बलात्कार केला. यानंतर सदर महिलेचा मृतदेह जवळच असलेल्या ओट्यावर नेत असताना तो उघड्या असलेल्या सेप्टीक टँकमध्ये पडला. तो तसाच सोडून आरोपीने हॉटेलवर जावून आपल्या खोलीतील कपडे एका पिशवीत भरले आणि तो तेथून पहाटेच्या सुमारास पायी चालत संगमनेर बसस्थानकाकडे आला. यावेळी आपल्या अंगावरील शर्टवर रक्ताचे डाग असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने रस्त्यातच शर्ट बदलला व बसस्थानकात येवून आंघोळ केली व तेथून तो अहमदनगरला गेला. तेथे पैसे संपल्याने त्याने 7 नोव्हेंबर रोजी आपल्या भाच्याला फोन करुन तीन हजारांची मागणी केली, त्यानुसार त्याला कोपरगावातील चौधरी यांच्याकडून पैसे मिळाले. त्यानंतर त्या दिवसापासून तो कोपरागव परिसरातच होता आणि पुन्हा पैशांची मागणी केल्यानंतर अलगत संगमनेर पोलिसांच्या हाती लागला.


सदर महिलेचा खून 4 नोव्हेंबर रोजी झाला होता व मृतदेह 22 नोव्हेंबर रोजी आढळला होता. जवळपास 18 दिवस मृतदेह पाण्यात असल्याने तो पूर्णतः सडलेल्या अवस्थेत होता. त्यातच सदर महिलेबाबतही कोणतीच माहिती नसल्याने पोलिसांसमोर या खुनाचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे होते. मात्र पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शर्थ करीत आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, निकीता महाले, सहाय्यक फौजदार राजू गायकवाड, पो.ना.अमित महाजन, विजय पवार, सचिन उगले, पो.कॉ.अमृत आढाव, साईनाथ तळेकर, सुरेश मोरे, गणेश बोरसे व अप्पर अधीक्षकांच्या कार्यालयातील पो.ना.फुरकान शेख यांच्या मदतीने या गुन्ह्याची अवघ्या दोन तासांत उकल करीत 48 तासांतच आरोपीला गजाआड केले. या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी खूनाचे कलम 302 व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी 201 नुसार गुन्हा दाखल केला होता, त्यात आता बलात्काराचे 376 कलम वाढविण्यात आले आहे. आरोपीला आज न्यायालयाससोर हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. संगमनेर पोलिसांनी केलेल्या या दमदार कारवाईचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. या दरम्यान सदर महिलेची ओळख पटविण्यातही पोलिसांना यश मिळाले असून सदरची महिला संगमनेर शहरातील जनतानगर परिसरात राहणारी असून ती वेडसर असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळावर सापडलेले कपडे आपल्या आईचेच असल्याचे मयताच्या मुलाने आणि त्याच्या पत्नीने आज (ता.25) दुपारी शहर पोलिसांना सांगितले आहे.


सदर प्रकरणात आमच्या हाती काहीही नसताना या प्रकरणातील प्रत्येक कडी एकमेकांना जोडीत आम्ही तपास पूर्ण केला आहे. यातील आरोपी छत्तीसगडमधील असला तरीही तो मोठ्या कालावधीपासून महाराष्ट्रातच वास्तव्याला आहे. या प्रकरणाच्या तपासात हॉटेल मालकाकडे आपल्याकडे काम करणार्‍या कामगाराची माहितीच नसल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. अशा प्रकारच्या वेडसर अथवा मनोरुग्ण महिला आपल्या परिसरात कोठे आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, जेणेकरुन त्यांना रुग्णालयात अथवा निराधार केंद्रात पाठविता येईल व अशा घटनांना पायबंद घालता येईल.
– राहुल मदने
उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर

Visits: 45 Today: 1 Total: 221413

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *