भाजप पदाधिकार्याकडून तब्बल दीड कोटीची फसवणूक कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
ठेका मिळवून देतो, असे सांगून तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या माजी पदाधिकार्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ठेका मिळवून देण्याचे आमिष दाखवून भरत उदयसिंग परदेशी (रा. मालेगाव) याने बनावट कागदपत्रे बनवून व माझे खूप मोठमोठ्या लोकांशी संबंध आहेत, असे भासवून तुम्हांला शासनाच्या नवीन कामाचा ठेका मिळवून देतो व तुम्हांला त्या नवीन कामाची कार्यारंभ आदेश पाहिजे असतील तर पैसे द्यावे लागतील, असे सांगून १ कोटी ४० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भावेश थोरात (वय ३४, कर्मवीरनगर, कोपरगाव, ता. कोपरगाव) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सदर गुन्हा ऑगस्ट २०१८ ते मार्च २०२३ या कालावधीत घडला असून १६ जानेवारी २०२३ रोजी नोंदवला गेला आहे. परदेशी हा ठरलेल्या कामाचा लवकरच कार्यारंभ आदेश काढून देतो, असे सांगून टाळाटाळ करत होता. ही बाब थोरात यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या पैशांची मागणी केली. तेव्हा तुमचे पैसे मी बुडवणार नाही, असे सांगत आठ दिवसांत तुमचे पैसे व कार्यारंभ आदेश देतो, असे सांगितले. परंतु त्यानंतर परदेशी याने थोरात यांचे फोन उचलणे बंद केले व भेटण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यावरुन आपली फसवणूक झाल्याचे थोरात यांच्या लक्षात आले. त्यानंतर थोरात यांनी न्यायालयात धाव घेतली असता याप्रकरणी कलम १५६ (३) नुसार न्यायालयाच्या आदेशाने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील सखोल पोलीस करत आहेत.