संगमनेर तालुक्यातील सदतीस ग्रामपंचायतीत निवडणुकांची रणधुमाळी! राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा; 20 डिसेंबरला होणार निकाल जाहीर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्या आणि नव्याने स्थापित झालेल्या तसेच, समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्याने मागील निवडणुकांमधून वगळलेल्या राज्यातील 35 जिल्ह्यांमधील 340 तालुक्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. सदस्यांसह थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार्या या निवडणुकांमध्ये संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील महिन्याच्या 18 तारखेला मतदान होणार असून 20 डिसेंबररोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुका होणार्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
याबाबत राज्य निवडणूक आयोगाने ई-मेलद्वारा राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश बजावले असून सर्वोच्च न्यायालयाच्या 4 मे रोजीच्या आदेशानुसार 10 मार्च पर्यंत पूर्ण झालेल्या निवडणूक प्रक्रियेपासून पुढील प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 18 नोव्हेंबररोजी निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करण्यात येईल, 28 नोव्हेंबर ते 02 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, 05 डिसेंबररोजी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येईल, 07 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, त्याच दिवशी दुपारी 3 वाजेल्यानंतर राहिलेल्या उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले जाईल, 18 डिसेंबररोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया राबविली जाईल व 20 डिसेंबररोजी मतमोजणी करण्यात येईल.
आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 203 ग्रामपंचायतींचा समावेश असून त्यात सर्वाधीक 37 ग्रामपंचायती संगमनेर तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल नगर तालुका 27, कोपरगाव 26, पारनेर 16, नेवासा 13, राहाता व शेवगाव प्रत्येकी 12, अकोले, राहुरी व पाथर्डी प्रत्येकी 11, श्रीगोंदा 10, कर्जत 08, श्रीरामपूर 06 व जामखेड तालुक्यातील 03 अशा एकूण 203 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
जनतेतून थेट सरपंचासह सदस्य निवडी होणार्या या निवडणुकांमध्ये संगमनेर तालुक्यातील साकूर, खराडी, वाघापूर, चिंचोली गुरव, जांभुळवाडी, रणखांबवाडी, दरेवाडी, जांबुत बु., कर्जुले पठार, डोळासणे, पिंपरणे, कोल्हेवाडी, कोळवाडे, मालुंजे, आंभोरे, निंबाळे, जोर्वे, वडझरी बु., निमोण, वडझरी खुर्द., तळेगाव दिघे, हंगेवाडी, कनकापूर, करुले, निळवंडे, पोखरी हवेली, सादतपूर, रहिमपूर, उंबरी बाळापूर, निमगाव जाळी, ओझर खुर्द, धांदरफळ बु., धांदरफळ खुर्द, निमगाव भोजापूर, चिकणी, सायखिंडी व घुलेवाडी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासर्व सदतीस ग्रामपंचायत क्षेत्रात आजपासून आदर्श आचार संहिता लागू झाली असून विद्यमान सदस्य व सरपंचांचे अधिकार संपुष्टात आले आहेत.