मालवाहतूक वाहनांची चोरी करणारी टोळी पकडली! पोलीस उपअधीक्षकांची कारवाई; साडेआठ लाखांची वाहने जप्त..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दुचाकी वाहने चोरीच्या घटना नेहमीच्याच असतांना गेल्या दोन-तीन वर्षात संगमनेर व अकोले तालुक्यातून मालवाहतूक करणार्‍या वाहनांसह शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीच्या घटनाही घडत होत्या. मध्यंतरी अकोले पोलिसांनी पिकअप जीप चोरणारी टोळी उघड केल्यानंतर आता संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांनी अशाच प्रकारची वाहने व ट्रॅक्टर चोरणारी टोळी उघड करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईत पोलिसांनी एका ट्रॅक्टर ट्रॉलीसह, एक पिकअप, एक अलिशान वाहन आणि तीन दुचाकी असा साडेआठ लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. या प्रकरणी तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून वाहन चोरीची मोठी टोळी उघड होण्याची शक्यता आहे. आज या दोघांनाही न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.

याबाबत संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी मार्चमध्ये संगमनेर शहरातील जोर्वेनाका येथून नफीस अनिस पठाण यांच्या मालकीचा महिंद्र कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली चोरुन नेली होती. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असताना पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना अशाप्रकारच्या वाहनांची चोरी करणार्‍या काही आरोपींचा सुगावा लागला. मात्र प्रत्येकवेळी त्यात खोडा पडत गेल्याने प्रत्यक्षात आरोपी हाती लागत नव्हते. म्हणून पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता त्याचा पाठपुरावा सुरुच ठेवला. आरोपींची नेमकी माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी या प्रकरणातील संशयीतांभोवती खबर्‍यांचे जाळेही विनले.

गेल्या वर्षभरापासून चोर आणि पोलिसांमध्ये सुरू असलेला लपंडावाचा हा खेळ अखेर गुरुवारी (ता.16) रात्री संपुष्टात आला. उपअधीक्षक मदने यांनी गेल्या सहा महिन्यांपासून ज्या चोरट्यांभोवती खबर्‍यांचे वलय निर्माण केले होते त्या वलयातून कंप जाणवू लागला आणि खबर्‍याचा फोन खणाणला. गुंजाळवाडी शिवारात गुंजाळांच्या घरासमोर अमुकतमूक ट्रॅक्टर व ट्रॉली उभी असून ती चोरीचीच असण्याचा दाट संशय माहिती देणार्‍या खबर्‍याने व्यक्त केला. त्यानुसार उपअधीक्षकांनी आपल्या पथकाला पाचारण करीत आवश्यक त्या सूचनांसह कारवाईचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथक वेल्हाळेे रस्त्यावरील विजय उर्फ सोनू रावसाहेब गुंजाळ (वय 22, रा.गुंजाळवाडी) याच्या घराजवळ पोहोचले असता मिळालेल्या माहितीनुसार वर्णनाचा ट्रॅक्टर व ट्रॉली तेथे उभी असल्याचे त्यांना दिसले. या प्रकरणात आरोपीचे नावही समोर आलेले असल्याने पोलिसांनी नेमक्या व्यक्तीचा माग काढीत त्याच्यावर झडप घातली. यावेळी त्याला दारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या मालकाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी त्याला तेथेच खाक्या दाखवला असता तो पोपटासारखा बोलू लागला. सदरील ट्रॅक्टर वर्षभरापूर्वी जोर्वे नाक्यावरुन चोरल्याची कबुली देत आणखीही काही गुन्हे केल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या कृत्यात आणखी कोणाचा सहभाग आहे असे विचारता त्याने जवळे कडलग शिवारातील वडगाव लांडगा रस्त्यावर राहणार्‍या अनिकेत उद्धव कडलग (वय 25) याचेही नाव सांगितल्यानंतर पथकाने गुंजाळवाडी शिवारातून विजय गुंजाळ याला ताब्यात घेवून त्याच्या घराजवळील ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली व लागलीच जवळे कडलगमध्ये छापा घातला. यावेळी घरातच असलेला आरोपी अलगद पोलिसांच्या हाती लागला. या दोघांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी जोर्वेनाक्यासह पुणे जिल्ह्यात चोर्‍या केल्याची कबुली देत लपवून ठेवलेला मुद्देमाल पोलिसांना दाखवला.


यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 3 लाख 50 हजार रुपये किंमतीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची दोनचाकी ट्रॉली, 2 लाख रुपये किंमतीचर महिंद्रा पिकअप जीप, 40 हजार रुपये किंमतीची बजाज प्लॅटीना व 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या दोन होंडा शाईन दुचाकी असा एकूण 8 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला. यावेळी आरोपींच्या ताब्यात असलेले तवेरा हे अलिशान वाहनही ताब्यात धेण्यात आले आहे. गुरुवारी (ता.16) या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना दुपारी न्यायालयासमोर हजर करुन कोठडी मागितली जाणार आहे. या दोघांच्या चौकशीतून मालवाहतूक वाहने चोरी करणारी टोळी उघड होण्यासह आणखी काही गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस निष्क्रीय भूमिकेत असताना पोलीस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मात्र एकामागून एक गुन्हे उघड करण्याचा धडाका लावला आहे. गुरुवारी याच पथकाने गुरुवारी धडाकेबाज कारवाई करीत मोठा मुद्देमालही हस्तगत केला आहे. या पथकात पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, सायबर विभागातील फुरकान शेख, पो.कॉ.अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर व गणेश शिंदे यांचा समावेश होता.

Visits: 136 Today: 1 Total: 1099012

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *