सावधान! आता संगमनेरात ‘तोतया’ अन्न निरीक्षकाची दहशत व्यापारी असोसिएशनचे पोलिसांना पत्र; दंड झाल्याचे सांगत पैशांची मागणी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलीस व पत्रकार असल्याचे भासवून लोकांना नागवण्याचे प्रकार सर्रास सुरु असताना आता संगमनेरात भलताच प्रकार समोर येत असून यातून चक्क व्यापार्‍यांनाच भिती दाखवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला व पुरुषाची एक जोडी असेच वेगवेगळे कारणामे करीत असल्याचे समोर आले असून ‘तुम्हाला अमुक मॅडमनी दंडाची नोटीस पाठवली असून दुकान सील करायचे नसेल तर गुगल पेवर पैसे पाठवा’ अशी मागणी वजा दमच भरला जात आहे. या प्रकारांनी संगमनेरातील अनेक व्यापारी वैतागले असून अशा प्रकारे पैशांची मागणी करणारे खरोखरी अन्न निरीक्षकच आहेत का? याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. याबाबतच्या तक्रारी समोर आल्यानंतर संगमनेरच्या व्यापारी असोसिएशनने शहर पोलिसांशी पत्रव्यवहार केला असून तोतयागिरी करुन व्यापार्‍यांकडून पैशे मागणार्‍यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत व्यापार्‍यांच्या शिखर संस्थेने शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागील दोन-तीन दिवसांपासून एक अनोळखी व्यक्ती शहरातील काही हॉटेल्सच्या चालकांना फोन करीत आहे. आपण अन्न निरीक्षक नारायण सजने (अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर) बोलत असल्याचे सांगत हे महाशय आमच्या कार्यालयातील सुरेखा वानखेडे यांनी तुम्हाला समन्स काढले आहे. त्यामुळे तत्काळ दंडाची रक्कम जमा करा, अन्यथा तुमचे हॉटेल सील केले जाईल असा दमही भरीत आहेत. असाच प्रकार शहरातील चार-सहा हॉटेल चालकांच्या बाबतीत घडल्यानंतर त्याची वाच्चता झाली आणि ही गोष्ट व्यापारी असोसिएशनपर्यंत पोहोचली.

असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाकडे चौकशी केली असता अशा नावाच्या कोणीही व्यक्ती संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत नसल्याची धक्कादायक माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली. त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला हा संपूर्ण प्रकार बनावट आणि तोतयागिरी करणारा असल्याचे स्पष्ट झाले. अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, उमेश सूर्यवंशी व राजेश बडे यांनी या प्रकरणी सावधानता बाळगून कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याची सूचना केली.

त्यानुसार संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट, उपाध्यक्ष सुमेध संत, सेक्रेटरी शरद गांडोळे, जुगल बाहेती व अरुण शहरकर यांनी ‘त्या’ काही हॉटेल चालकांसह मंगळवारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची भेट घेवून त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. यातून अद्यापपर्यंत कोणीही पैशांचा व्यवहार केला नसला तरीही भविष्यात अशा तोतया व्यक्तीकडून एखाद्या व्यावसायिकाची फसवणूक होण्याची दाट शक्यता असल्याने वेळीच त्यांचा शोध घेवून योग्य ती कारवाई करण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली. या वृत्ताने शहरातील व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी त्या भामट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

Visits: 141 Today: 1 Total: 1098348

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *