संगमनेर तालुक्यात कोविडचे धक्का तंत्र आजही अव्याहत..! शहरासह तालुक्याच्या रुग्णसंख्येत मोठी भर पडल्याने तालुका पोहोचला अठराव्या शतकाच्या दारात..

श्याम तिवारी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याला कोविडचे धक्का देण्याचे तंत्र अव्याहत असून आजही शहरासह तालुक्याला धक्के देणारे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातच कोविडच्या सावटाखाली साजर्या झालेल्या गणेश विसर्जनाच्या दिवशीही कोविडने दोघांचा बळी घेत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 42 बाधितांची भर घातल्याने या महिन्यातही रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. आज शासकीय, खासगी प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीतून तालुक्याच्या रुग्णसंख्येत 37 रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे या अहवालातून तालुक्यातील 31 तर शहरातील अवघे सहा रुग्ण बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या 1 हजार 799 वर पोहोचली आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिनी साध्या पद्धतीने मात्र अलोट उत्साहात आणि भक्तिभावाने श्रींचे विसर्जन सुरु असतांना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शहरातील माळीवाडा परिसरातील 70 वर्षीय इसमाच्या तर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शहरानजीकच्या समनापूरमधील स.म.भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे माजी संचालक व समनापूरच्या निवृत्त कामगार पोलीस पाटीलांच्या निधन वार्तेने तालुक्यातील श्री विसर्जनाच्या उत्साहाला गालबोट लावले.

या दोघांच्या मृत्युने शोककळा पसरलेल्या संगमनेर तालुक्याला त्यानंतरच्या काही वेळातच तब्बल 42 जणांच्या संक्रमित अहवालाने आणखी एक धक्का बसल्याने अवघा तालुका हादरला. मंगळवारी रात्री उशीराने प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील अकरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात इंदिरानगरमधील 33 वर्षीय महिला, माळीवाड्यातील 51 वर्षीय इसम, साईबन सोसायटीतील 58 वर्षीय इसमासह 52 वर्षीय महिला, कुंभारआळा येथील 30 वर्षीय तरुण, गोविंद नगरमधील 36 वर्षीय तरुण, मालदाडरोडवरील 52 व 37 वर्षीय महिला, शिवाजी नगरमधील 31 वर्षीय महिला, नाईकवाडपूरा भागातील 51 वर्षीय इसम व बाजारपेठेतील 52 वर्षीय इसमाचा समावेश होता.

तर तालुक्यातील 31 जणांच्या अहवालातून कनोली येथील 60 व 46 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 38 वर्षीय महिला, रहिमपूर व कौठे धांदरफळ येथे कोविडचा उद्रेक झाला असून रहिमपूरमधील 60, 38 व 34 वर्षीय इसमांसह चार व दोन वर्षीय बालक तसेच सहा वर्षीय बालिका, तर कोठे धांदरफळमधील 55, 33, 23 व 22 वर्षीय महिलांसह 91 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 62, 34, 33 व 27 वर्षीय इसम तसेच सहा वर्षीय बालक बाधित झाले आहेत.

त्यासोबतच ढोलेवाडीतील 54 वर्षीय महिला, कुरकुटवाडीतील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वाघापूरमधील 55 वर्षीय इसम, घारगावमधील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, माळेगाव पठारावरील 33 वर्षीय तरुण, पिंपरणे येथील 24 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, धांदरफळ येथील 32 वर्षीय तरुण, दाढ बु. येथील 53 वर्षीय इसम, वडगावपान येथील 43 वर्षीय तरुण, जाखोरी येथील 59 वर्षीय इसम व चिंचोली गुरवमधील 52 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. मंगळवारी तालुक्यातील बाधितांच्या संख्येत 42 जणांची भर पडल्याने रुग्णसंख्या 1 हजार 762 वर जावून टेकली होती.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून 21, खाजगी प्रयोगशाळेकडून 15 व रॅपिड अँटीजेन चाचणीतून एका रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आला आहे. विशेष म्हणजे आजच्या अहवालात संगमनेर शहरातील केवळ सहा जणांचा समावेश आहे. त्यात बाजारपेठेतील 67 वर्षीय महिला, मालदाड रोड परिसरातील 37 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, जानकीनगर परिसरातील 37 वर्षीय तरुण, कामगार वसाहतीतील 36 वर्षीय तरुण, तसेच येथील 48 वर्षीय इसम.

तर तालुक्यातील खराडी येथील 46 व 23 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 38 वर्षीय महिला, निमोण येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 65 वर्षीय महिला, जोर्वे येथील 54 व तीस वर्षीय महिलांसह 26 वर्षीय तरुण, समनापुर येथील साठ 35 व 32 वर्षीय महिलेसह चार वर्षीय बालक, घुलेवाडीतील 61 वर्षीय महिलेसह 40 वर्षीय तरुण व 10 वर्षीय बालक, कुरकुटवाडीतील 68 वर्षीय जेष्ठ नागरिकासह 47 वर्षीय व सतरा वर्षीय तरुण, सारोळे पठार येथील 30 वर्षीय तरुण, निमगाव जाळी येथील 50 वर्षीय इसम, कौठे धांदरफळ येथील 36 वर्षीय तरुण, रायतेवाडी येथील 40 वर्षीय तरुण,

चिखली येथील 51 वर्षीय इसम, रहिमपुर येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, अंभोरे येथील 36 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 74 वर्षीय वयोवृद्ध इसम, सावरगाव तळ येथील 18 वर्षीय तरुणांसह बारा वर्षीय बालक, नांदूर खंदरमाळ येथील 50 वर्षीय इसम व चिंचोली गुरव येथील 34 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तालुक्याच्या रूग्ण संख्येत आजही 37 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या अठराव्या शतकाच्या दारात 1 हजार 799 वर जाऊन पोहोचली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता १९ हजार १८३ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ८४.४९ टक्के इतके आहे.
आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या ६२६..
यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्र २२६, संगमनेर १४, राहाता ६८, पाथर्डी १०, नगर ग्रामीण ३१, श्रीरामपूर ४३, अहमदनगरचा लष्करी परिसर ०८, नेवासा १३, श्रीगोंदा ३२, पारनेर २४, अकोले ३३, राहुरी ३६, शेवगाव २५, कोपरगाव २४, जामखेड ०९, कर्जत २७, लष्कर रुग्णालय ०२ व इतर जिल्ह्यातील ०१.

- जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या : १९ हजार १८३..
- जिल्ह्यातील उपचार सुरु असलेले रूग्ण : ३ हजार २१५..
- जिल्ह्यातील आजवरचे कोविड मृत्यू : ३०६..
- जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या : २२ हजार ७०४..
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्के..
- जिल्ह्यात आज नव्या ६२२ बाधितांची भर..

