तनपुरे कारखान्याच्या कामगारांचा थकीत वेतनासाठी एल्गार मागण्या मान्य केल्या नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा

नायक वृत्तसेवा, राहुरी
तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी मंगळवारी (ता.8) थकीत वेतनासाठी एल्गार पुकारण्याचा एकमुखी निर्णय घेतला. कारखान्याचे कुलदैवत लक्ष्मीनारायण मंदिरात शपथ घेतली. कारखाना व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर न्यायालयीन लढाई व उपोषण-जनआंदोलन मार्गाने रस्त्यावर संघर्ष केला जाईल, असा इशारा कामगारांनी दिला.

डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने यंदाच्या वर्षी कारखाना सुरू करण्यास असमर्थ असल्याचे कळविल्याने, कर्जदार जिल्हा बँकेतर्फे कारखान्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून, मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे, कामगारांची रोजीरोटी बंद झाली. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या आधिपत्याखाली सहा वर्षांपासून संचालक मंडळ कार्यरत आहे.

कामगार यूनियनचे अध्यक्ष गजानन निमसे यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांच्या चिंतन बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. कामगार नेते इंद्रभान पेरणे, अर्जुन दुशिंग, सचिन काळे, सुरेश थोरात, चंद्रकांत कराळे, सीताराम नालकर यांनी कारखान्याचे कायम, निवृत्त, मजुरी हजेरी व संकलित वेतनावरील कामगारांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. जिल्हा बँकेने 111 कोटींच्या कर्जासाठी कारखाना ‘सील’ केला. कामगारांचे 128 कोटी बिगरव्याजी आहेत. खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (उत्तर) रावसाहेब खेवरे यांच्या समवेत बैठकीत मागील सहा वर्षांच्या काळातील कामगारांच्या वेतनाची थकीत देणी अदा करण्याचा शब्द देण्यात आला. परंतु, आता लेखी आश्वासनात पैसे उपलब्ध होतील, तसे टप्प्याटप्प्याने देऊ, असे कळवून व्यवस्थापनाने तोंडाला पाने पुसली. ऊस असताना कारखाना बंद ठेवून, कामगारांना वार्यावर सोडले, असे आरोप कामगार नेत्यांनी केले.

सहा वर्षांचा कारभार चव्हाट्यावर आणू!
कारखान्याच्या संचालक मंडळाला यूनियनतर्फे मागण्यांचे पत्र देऊन, येत्या दहा-बारा दिवसांत मागण्या मान्य केल्या नाहीत, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, जनआंदोलन छेडले जाईल. उपोषणाच्या मंडपात मागील सहा वर्षांचा कारभार चव्हाट्यावर आणू, असा इशारा कामगार नेते इंद्रभान पेरणे यांनी दिला. महिला कामगारांनीही संघर्षात उतरण्याची शपथ घेतली.
