नागपूरच्या संघाने राज्यस्तरीय योगासन स्पर्धा गाजवली! तिसर्या राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप; विजेत्यांना राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन, बृहंमहाराष्ट्र योग परिषद व ध्रुव ग्लोबल स्कूलच्या संसुक्त विद्यमाने संगमनेरात पार पडलेली तिसरी राज्यस्तरीय सिनिअर योगासन स्पर्धा नागपूरच्या संघाने गाजवली. या संपूर्ण स्पर्धेत दोन गटात प्रत्येकी चार प्रकारांत खेळतांना नागपूरच्या स्पर्धकांनी सर्वाधीक गुणांसह पाच सुवर्ण, चार रौप्य व एका कांस्यपदकाची कमाई केली. पंधरा गुणांसह तीन सुवर्णपदके पटकावणारा रत्नागिरीचा संघ या स्पर्धेत उपविजेता ठरला. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या पदाधिकार्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदक व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील दोन स्वतंत्र क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील 36 जिल्ह्यांमधून 152 स्पर्धक सहभागी झाले होते, त्यात 73 मुलींचाही समावेश होता. मुला-मुलींच्या स्वतंत्र गटात व योगासनांच्या विविध चार प्रकारात झालेल्या या स्पर्धेत नागपूरच्या वैभव श्रीरामे याने चार तर रत्नागिरीच्या पूर्वा किनरेने तीन पदकांसह अव्वलस्थान पटकाविले. पारंपरिक योगासनांमध्ये मुलांच्या वैयक्तिक गटात वैभव श्रीरामे, वैष्णव कोरडे (नगर) व ओम वरदाई (कोल्हापूर), तर मुलींच्या गटात छकुली सेलोकर, कल्याणी चुटे (दोघी नागपूर) व सानीका जाधव (कोल्हापूर) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.
कलात्मक योगासनांमध्ये मुलांच्या गटात वैभव श्रीरामे, पवन चिखले (पुणे) व ओम वरदाई तर, मुलींच्या गटात पूर्वा किनरे, छकुली सेलोकर व कल्याणी जाधव यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. कलात्मक योगासनांच्या दुहेरी प्रकारात मुलांच्या गटात नागपूरच्या वैभव श्रीरामे व हर्षल चुटे यांच्या जोडीने प्रथम, कोल्हापूरच्या ओम वरदाई व मनन कासलीवाल या जोडीने दुसरा तर अहमदनगरच्या विष्णू चक्रवर्ती व वैष्णव कोरडे यांच्या जोडीने कांस्यपदकासह तिसरा क्रमांक मिळवला. याच प्रकारात मुलींच्या गटात रत्नागिरीच्या पूर्वा किनरे व प्राप्ती किनरे यांनी पहिला, नागपूरच्या छकुली सेलोकर व सृष्टी शेंडे यांनी दुसरा आणि कोल्हापूरच्या सानीका जाधव व प्रज्ञा गायकवाड या जोडीनेे तिसरा क्रमांक पटकावला.
योगासनांच्या तालात्मक प्रकारात वैभव श्रीरामे व हर्षल चुटे या जोडीचे वर्चस्व राहीले. ओम वरदाई व मनन कासलीवाल यांनी दुसरा, अहमदनगरच्या दीपांशू सोलंकी व वैष्णव कोरडे यांनी तिसरा क्रमांक तर, मुलींच्या गटात पूर्वा किनरे व प्राप्ती किनरे यांनी पहिला, छकुली सेलोकर व कल्याणी चुटे यांनी दुसरा आणि प्रज्ञा गायकवाड यांनी तिसरा क्रमांक मिळवला. या संपूर्ण स्पर्धेत नागपूरच्या संघाने 38 गुणांसह पाच सुवर्ण, चार रौप्य व एका कांस्यपदकासह चॅम्पियनशीपचा किताब पटकाविला, तर रत्नागिरीच्या संघाने 15 गुणांसह तीन सुवर्ण पदकांची कमाई करतांना दुसर ेस्थान प्राप्त केले. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या खेळाडूंमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या संघाची निवडही केली जाणार आहे.
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, सचिव डॉ. संजय मालपाणी, उपाध्यक्ष डॉ. रमेश मंत्री, तांत्रिक समितीचे अध्यक्ष सतीश मोहगावकर, स्पर्धा व्यवस्थापक राजेश पवार, ध्रुव ग्लोबल स्कूलचे व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी, स्नेहल पेंडसे व नीलेश पठाडे आदींच्या उपस्थितीत विजयी स्पर्धकांना पदकांसह प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या योगासन खेळाडूंचा विशेष सत्कारही करण्यात आला. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवर व प्रेक्षकांसमोर ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्यवंदना व योगासनांच्या सामूहिक प्रात्यक्षिकांनी टाळ्या मिळवल्या.