शिवसैनिकांकडून जिल्हाप्रमुखांच्या प्रतिमेचे दहन! संगमनेरातील प्रकार; ‘खेवरे हटाओ, शिवसेना बचाओ’च्या घोषणा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
उत्तर नगर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नूतन पदाधिकार्यांच्या घोषणेवरुन पेटलेल्या ज्वाळा अद्यापही शांत होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी अकोले व कोपरगावमध्ये याच विषयावरुन स्वपक्षातील वरीष्ठ पदाधिकार्यांविरोधात पेटलेल्या आंदोलनाची धग आता संगमनेरातही पोहोचली. आज दुपारी माध्यान्नाला शहरातील काही शिवसैनिकांनी बसस्थानकाजवळ एकत्रित होवून उत्तर नगरजिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी ‘खेवरे हटाओ, शिवसेना बचाओ’च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता.
गेल्या शनिवारी (ता.29) ठाकरे गटाच्या शिवसेनेने शिर्डी लोकसभा मतदार संघातील कोपरगाव, राहाता, संगमनेर व अकोले तालुक्यातील नूतन पदाधिकार्यांच्या नावांची घोषणा केली होती. त्यातून पक्षाने अन्याय केल्याची भावना निर्माण होवून कोपरगाव व अकोल्यात संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्या विरोधात आंदोलने झाली. अकोल्यात तर घोलप यांच्या प्रतिमेला जोडो मारण्याचा व नंतर दुसर्या गटाकडून दुग्धाभिषेक घालण्याचाही प्रकार घडला. संगमनेरातही रायतेवाडी फाट्याजवळ आंदोलन करुन नूतन पदाधिकारी निवडीचा निषेध नोंदविला गेला.
या सर्व घटनांची दखल घेवून शुक्रवारी (ता.4) शिवसेनेच्या ठाकरे गटाने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या पदाधिकार्यांच्या निवडीला स्थगिती दिली. त्यामुळे पक्षाच्या शनिवारच्या आदेशानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांमध्ये समाधान निर्माण झालेले असतांना आता सेनेतील दुसर्या गटाकडून स्थगितीवरुन आंदोलने सुरु झाली आहेत. असाच प्रकार आज संगमनेरातही घडला असून माध्यान्नाच्या सुमारास शहरातील 30 ते 40 शिवसैनिकांनी बसस्थानकासमोर एकत्रित होवून जोरदार घोषणाबाजी केली व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रतिमेचे दहनही केले. यावेळी खेवरे यांच्याविरोधात संतप्त शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केल्याचे दिसून आले.
या आंदोलनाबाबत शिवसेनेत दोन गटांची परस्पर विरोधी भूमिका प्रकर्षाने समोर आली असून पक्ष खिंडीत अडकल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक सदरच्या निवडी जाहीर झाल्या तेव्हा जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेलेले होते. त्यामुळे नूतन पदाधिकार्यांच्या निवड प्रक्रियेत त्यांचा संबंध नसल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत, तर खेवरे यांच्या स्वतःच्या तालुक्यात शिवसेनेचे कोणतेही अस्तित्व नसताना त्यांच्याकडे गेल्या मोठ्या कालावधीपासून जिल्हाप्रमुखाचे पद असताना उत्तरेत शिवसेनेची वाढ खुंटल्याचे आज आंदोलन करणारे शिवसैनिक सांगत आहेत. यामुळे नूतन पदाधिकार्यांची निवड हा विषय शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरला असून या निर्णयाने आधीच अडचणीत असलेल्या पक्षाचे पाय आणखी खोलात गेले आहेत.
शिवसेना पक्ष हा केवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार चालणारा आहे. गेल्या आठवड्यात पक्षाने जाहीर केलेल्या पदाधिकार्यांच्या निवडी त्यांच्याच आदेशाने झाल्या होत्या. असे असताना संगमनेरातील काहींनी आज बसस्थानकासमोर आंदोलन करुन शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या प्रतिमेचे दहन केले. हा प्रकार शिवसैनिकांसाठी वेदनादायी असून पक्षशिस्तीचा भंग करणारे आहे. त्यामुळे आज आंदोलन करणार्यांविरोधात पक्षाने कारवाई करावी अशी आपण मागणी करणार आहोत.
– प्रसाद पवार, शहरप्रमुख
आजच्या आंदोलनाबाबत आपणास कोणतीही माहिती नाही, मात्र याबाबत आपण माहिती घेत असून त्यानंतरच यावर प्रतिक्रिया देवू.
– अमर कतारी, शहरप्रमुख