महसूल विभाजनाच्या ‘व्हायरल’ प्रस्तावात ‘छेडछाड’ केल्याचा संशय! आमदार अमोल खताळ यांचा गंभीर आरोप; ‘वैफल्यातून’ प्रकार घडल्याचीही जहरी टीका..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपर तहसील कार्यालय व्हावे अशी लोकांचीच मागणी आहे. मात्र त्यात समावीष्ट गावांबाबत नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. संगमनेरच्या तहसीलदारांनी मागील सरकारच्या निर्णयानुसार सदरचा प्रस्ताव पाठवला होता. तो प्रशासकीय कामकाजाचा भाग असून त्यावर अंतिम मोहोर उमटलेली नाही. याबाबतची अधिक माहिती घेतल्यानंतर तहसील कार्यालयातील कोणीतरी जाणीवपूर्वक हा अर्धवट प्रस्ताव विरोधकांना पुरवल्याचा गंभीर आरोप करीत त्यात ‘छेडछाड’ करुन जनतेमध्ये गैरसमज पसरवला जात असल्याचा संशय आमदार अमोल खताळ यांनी आज पत्रकार परिषदेतून व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याने अनेक गंभीर प्रश्न उभे राहीले असून या प्रकरणाच्या मुळाशी जावून सत्य समोर आणण्याची गरज आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयाकडून संगमनेरच्या तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकार्यांना सादर झालेल्या ‘प्रशासकीय विभाजना’च्या प्रस्तावाचा दाखला देत ‘तालुका तोडण्याचा डाव’ अशा आशयाचा मजकूर असलेले भडक मेसेज ‘व्हायरल’ केले गेले. त्यासोबत तहसील कार्यालयाच्या नाव आणि राजमुद्रेसह असलेला ‘महसुली विभाजना’चा ‘तो’ प्रस्तावही चिकटवण्यात आला होता. त्यात नव्याने आकाराला येणार्या आश्वी बुद्रुक तहसील कार्यालयाच्या कक्षेत येणार्या महसुली मंडलांसह गावांची नावे स्पष्टपणे दिसत होती. ‘घात झाला..’ असं भडकंपणाने सांगत शहरानजीकच्या गावानांही आश्वीला जोडले. ही कसली प्रशासकीय सोय, हा तर संगमनेरला अध्वस्थ करण्याचा डाव. हा अन्याय मोडून काढण्यासाठी पेटून उठा.. एक व्हा.. असे आवाहनही केले गेले.
माजीमंत्री थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या निर्णयाला कडाडून विरोध करीत नाव न घेता विखेंसह खताळांवरही टीकास्त्र सोडले होते. त्याचा समाचार घेण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी गेल्या दोन दिवसांतील ‘सोशल’ चर्चांना समोर ठेवून त्यांनी जनतेचा विश्वास आपल्यासाठी सर्वोपरी असल्याचा उल्लेख केला. मागील सरकारच्या काळात प्रशासकीय कामकाजाचा ताण कमी करण्यासाठी मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यांचे प्रशासकीय कामकाजासाठी विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून संगमनेरच्या तहसीलदारांनीही जिल्हाधिकार्यांना तसा प्रस्ताव सादर केला आहे हे खरे आहे. हा प्रशासकीय कामाचा भाग असून विभाजनात समावीष्ट होणार्या गावांबाबत नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
तालुक्यातील जनतेने मला विश्वासाचे मतं देवून निवडून दिले आहे, त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही अशी ग्वाही देताना त्यांनी सदरचा प्रस्ताव अद्याप विभागीय स्तरावरच असून बुधवारी (ता.29) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केल्याचे ते म्हणाले. तहसील कार्यालयाकडून हा प्रस्ताव पाठवताना आवश्यक काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे तो विरोधकांच्या हाती लागला. त्यांनी मूळ प्रस्तावात छेडछाड करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महसुली विभाजनाने जनतेला अधिक तत्पर सेवा मिळेल. मात्र विरोधकांकडून जणू तालुक्याचे भौगोलिक विभाजन होवून आश्वी तालुका होत असल्याचे खोटे चित्र निर्माण करुन लोकांमध्ये गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या ‘त्यांना’ कोणतेही काम नसल्याचे सांगत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांनी ‘वैफल्यातून’च असा प्रकार घडत असल्याची जहरी टीकाही त्यांच्यावर केली.
पुढील आठवड्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून या प्रस्तावाला स्थगिती घेणार आहोत. त्यानंतर या महसूल विभाजनात समावीष्ट होणार्या गावांना विश्वासात घेवूनच त्यांचा आश्वी तहसीलच्या कार्यक्षेत्रात समावेश केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. पूर्वीच्या महसुली मंडलांची फेररचना होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. संगमनेर खुर्द, निमज, समनापूर या सारख्या गावांबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगताना त्यांनी विरोधकांकडून प्रशासकीय कामाचे विभाजन म्हणजे जणू तालुक्याचे विभाजन अशी आवई सुरु असल्याची टीका त्यांनी केली. श्रीरामपूरमध्ये अपर पोलीस अधिक्षकांचे, शिर्डीत अपर जिल्हाधिकार्यांचे कार्यालय सुरु झाले म्हणजे जिल्ह्याचे विभाजन झाले का? असा सवाल करीत आमदार खताळ यांनी संगमनेर तालुका भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा असल्याने त्याचे महसूली कामाकाजासाठी विभाजन आवश्यक असल्याची गरजही व्यक्त केली.
हा प्रस्ताव तयार करताना घाई झाली की खोडसाळपणा याचा आपण शोध घेवून शासनाची गोपनीय कागदपत्र विरोधकांना पुरवणार्यांचा शोध घेणार असल्याचा पुनरुच्चार करीत संगमनेर तालुक्यातील जनतेने चाळीस वर्षांची दहशत मोडून आपल्याला विजयी केले आहे. त्यांच्या विश्वासाला आपल्याकडून कधीही तडा जाणार नाही. तालुक्यात राबवला जाणारा कोणताही प्रभावी शासननिर्णय जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय राबवणार नसल्याची ग्वाही त्यांनी या पत्रकार परिषदेतून दिली.
दोन दिवसांपूर्वी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयाकडून अपर आश्वी तहसील कार्यालयाच्या प्रस्तावावरुन मोठे वादळं उठवण्यात आले होते. हा प्रकार म्हणजे संगमनेर तालुक्याला तोडण्यासारखा असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला होता. शहराच्या लगत असलेल्या गावांचा आश्वीच्या कार्यक्षेत्रात समावेश राजकारणाचा भाग असल्याचेही त्यातून दर्शवण्यात आल्याने आमदार अमोल खताळ त्यावर काय बोलतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. आज त्यांनी पत्रकार परिषदेतून माजीमंत्री थोरात यांचे नाव न घेता जोरदार पलटवार करतांना ‘वैफल्यातून’ जनतेत ‘संभ्रम’ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची जहरी टीका त्यांनी केली. त्याला थोरातांकडून काय उत्तर मिळते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.