कुस्त्यांचा फड गाजवणार्या पहिलवानाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार! दोनच दिवसांपूर्वी घारगावचे मैदान गाजवले; मुलीच्या नातेवाईकांकडून बेदम मारहाण, अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कुस्त्यांचा फड गाजविणार्या खैरदरा येथील पहिलवानाने चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी घारगाव येथे पार पडलेल्या यात्रौत्सवात या पहिलवानाने मर्दुमकी दाखवतांना अनेक बक्षीसं पटकाविली होती. त्यातून मिळालेल्या पैशातून तर्राट झालेल्या या पहिलवानाने शनिवारी पहाटेच्या सुमारास घरात झोपलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या तोंडात तिचीच ओढणी कोंबून अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईसह अन्य नातेवाईकांनी दारुच्या नशेत झिंगलेल्या पहिलवानाची यथेच्छ धुलाई केल्याने अत्यवस्थ अवस्थेत त्याला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पहिलवान नवनाथ आनंदा चव्हाण याच्यावर बलात्कारासह पोक्सो आणि अॅट्रोसीटीतंर्गत तर जखमी पहिलवानाच्या फिर्यादीवरुन पीडितेच्या आईसह सात जणांवर लाठ्या-काठ्यांसह मारहाण करीत गंभीर जखमी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पठारभागात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पठारावरील दुर्गमभागात घडली. यातील चौदा वर्षांची पीडित मुलगी घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपलेली होती, तर तिची आई घराबाहेर दारातच झोपी गेली होती. पहाटेच्यावेळी आरोपी नवनाथ आनंदा चव्हाण हा दारुच्या नशेत त्यांच्या घराजवळ आला व अनाधिकाराने त्याने घरात प्रवेश करीत आतून दरवाजा लावून घेतला. यावेळी गाढ झोपेत असलेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या तोंडात तिचीच ओढणी कोंबून त्याने अमानुषपणे तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकारानंतर त्या मुलीने दारातच झोपलेल्या आपल्या आईला हाका मारल्याने त्या उठल्या, यावेळी घडला प्रकार त्यांना समजल्यानंतर त्यांनी आरोपी पहिलवानाला लाथाबुक्क्यांसह लाकडी दांड्याने मारहाण केली. या दरम्यान पीडित मुलीने धावत जावून शेजार्यांनाही हा प्रकार सांगितल्याने त्यांनीही पीडितेच्या घरासमोर येत त्या नराधम पहिलावानाची लाकडी दांड्याने यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याने अत्यवस्थ झालेल्या त्या पहिलवानाचे दोन्ही पाय बांधून त्यांनी त्याला उसाच्या शेतात नेवून टाकले. सकाळपर्यंत तो तेथेच पडून होता. दिवस उजेडल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेला तो पहिलवान काहींना दिसल्यानंतर त्याला उपचारार्थ आळेफाटा (ता.जुन्नर, जि.पुणे) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी पीडित मुलीने घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी नवनाथ आनंदा चव्हाण (वय 40, रा.खैरदरा, कोठ बु.) याच्या विरोधात भा.द.वी.कलम 376 (2) (।) सह बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 4 व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अॅट्रोसीटी) कलम 3 (2)(5), 3 (2)(व्ही.ए), 3(1)(डब्ल्यु)(।)(॥) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने स्वतः करीत आहेत. यावृत्ताने पठारभागात एकच खळबळ उडाली असून दोनच दिवसांपूर्वी कुस्त्यांच्या मैदानात फड गाजवतांना शेकडों लोकांची वाहवा मिळवणार्या पहिलवानाने केलेल्या दुष्कृत्याबाबत आता संताप व्यक्त होत आहे.
अत्याचाराच्या घटनेनंतर पीडतेच्या आईसह अन्य काहींनी त्या पहिलवानाला लाठ्या-काठ्यांसह बेदम मारहारण केल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घारगाव पोलिसांनी तेथे जावून त्याचा जवाब नोंदविला असून त्यानुसार पीडितेच्या गावातील एकजण फिर्यादी पहिलवानाला घारगावमध्ये भेटला. यावेळी त्याने आपणास मोटार सायकलवरुन घरी सोडण्यास सांगितले असता त्याला आपल्या दुचाकीवर बसवून ते दोघे त्या ठिकाणी आले. यावेळी त्या जोडीदाराच्या पत्नीने बाहेर येत ‘तु याला कामावर कशासाठी नेतोस? याला घेवून जायचे नाही’ असे म्हणत तिच्यासह तिच्या दोन भावांनी त्या पहिलवानास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे आलेल्या अन्य चार-पाच जणांसह त्या सर्वांनी मिळून फिर्यादीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.
त्यानंतर अर्धमेल्या झालेल्या त्या पहिलवानाचे दोन्ही पाय दोरीने बांधून त्याला सुमारे अर्धा किलोमीटर फारफटत नेण्यात आले व तेथेही पुन्हा लाकडी दांड्याने मारहाण करीत त्याला पुणे-नाशिक महामार्गाच्या लगतच्या एका शेतात फेकून देण्यात आले. सध्या त्याच्यावर आळेफाटा येथील सोनवणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याने दिलेल्या जवाबावरुन घारगाव पोलिसांनी त्या महिलेसह अन्य सात जणांवर भा.द.वी.कलम 326, 342, 143, 147, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक आर.ई.लांघे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
अत्याचाराची घटना आणि त्यानंतर आरोपीला मारहाण झाल्याचा प्रकार प्रथमदर्शनी वास्तव वाटत असला तरीही त्यात अधिक तपासाची आवश्यकता आहे. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल अजून अप्राप्त आहे. अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीसोबत त्याचा एक जोडीदार असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे, मात्र अद्याप त्याची ओळख स्पष्ट झालेली नाही. आरोपीच्या दुचाकी वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. घटनास्थळावरील काही गोष्टींचा अधिक सखोल तपास करण्याची गरज असल्याने आम्ही प्रत्येक बारकावा गांभीर्याने तपासत आहोत. त्यातून या दोन्ही घटनांतील नेमकं सत्य समोर येईल.
– राहुल मदने
उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर