… तोपर्यंत स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा ः पवार शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचे ‘मंथन वेध भविष्याचा’ चिंतन शिबिर
नायक वृत्तसेवा, शिर्डी
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून (ता.4) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डीत चिंतन शिबिर सुरू आहे. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा, असे निर्देश आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत. विशेष म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस, शिवसेनेसोबत जाण्याचा विचार करतोय. याबाबत प्रांतिक पातळीवर निर्णय कळविला जाईल. पण तोवर एकट्याने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी अजित पवारांनी आपल्या पक्षातील नेते आणि पदाधिकार्यांना देखील मोलाचा सल्ला दिला. ते आपल्या पक्षातील लोकांनाही आमिष दाखवत आहेत. आपल्या लोकांनाही काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका, असं आवाहन अजित पवारांनी केलंय. राष्ट्रवादीचे बारा नेते फुटले आहेत, फक्त मुहूर्त ठरायचा आहे. सोलापूरमधील मोठा नेता फुटणार आणि विरोधकांना मोठा दणका बसणार आहे. फक्त थोडं थांबा वाट पहा असा गौप्यस्फोट काय झाडी, काय डोंगार या वाक्याने प्रचंड प्रसिद्धी झोतात आलेले आमदार शहाजी पाटील यांनी केलेला आहे. या पार्श्वभूमीवर पवारांच्या इशार्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी ‘मंथन वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय चिंतन शिबिराचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, खासदार सुनील तटकरे, आमदार आदिती तटकरे, धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, विधानसभेचे माजी अध्यक्ष नरहरी हिरवळ, आमदार रोहित पवार, नीलेश लंके, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, प्राजक्त तनपुरे, संग्राम जगताप आदिंसह राज्यभरातून आलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांच्या उपस्थितीत शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे उत्साहात करण्यात आले. दोन दिवसीय शिबिरासाठी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 हजारापेक्षा जास्त पदाधिकारी शिबिरासाठी उपस्थित आहेत. शुक्रवारच्या सत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, विचारवंत मनोहर भावे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अर्थतज्ञ पाटील, विजय चोरमारे, संजय आवटे आदिंनी मनोगत व्यक्त केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये आघाडीची वाट पाहत बसू नका. त्याबाबतचा निर्णय लवकरच होईल. मात्र तुम्ही कामाला लागा. आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा, असे स्पष्ट करतानाच, जिथे आपण कमी असू तिथे आघाडी करू. काँग्रेस-शिवसेना बरोबर जाऊया, असं पवार म्हणाले. आपली ताकद स्थानिक पातळीवर दिसली तरच मित्रपक्ष आपल्यासोबत चर्चा करायला येतील, असं देखील अजित पवार यावेळी सांगण्यास विसरले नाहीत. सरकार आपले नाही. आपण माजी मंत्री, माजी राज्यमंत्री आहात. ज्यांना जे जिल्हे दिले आहेत तिथे दुर्लक्ष करायचं नाही. तुम्हाला लाल दिवा दिला होता ते विसरू नये. सगळे सण झाले. आता एकच काम आहे, पक्षाचं काम केलं पाहिजे, असेही ते म्हणाले.