उठा.. उठा पाऊस उघडला, खड्डे बुजविण्याची वेळ आली! पठारभागातील खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे उठा.. उठा पाऊस उघडला खड्डे बुजविण्याची वेळ आली असे म्हणण्याची वेळ संतप्त वाहनचालक व नागरिकांवर आली आहे.
दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे म्हणून ओळखले जाणारे घारगाव ते कोठे बुद्रुक, वनकुटे, बोटा ते कुरकुटवाडी, शेळकेवाडी ते अकलापूर, केळेवाडी ते अकलापूर, बावपठार ते नांदूर आदी डांबरी रस्त्यांसह वाड्या-वस्त्यांनाही जोडणार्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. पावसामुळे डांबरी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्तेही वाहून गेले आहेत. त्यामुळे सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. पावसामुळे या डांबरी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या रस्त्यांवरून छोटी-मोठी वाहने, स्कूलबस, शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. खड्डे हुकवयाच्या नादात अनेकदा अपघात होतात. दुचाकीस्वारांच्या पाठीचे मणकेही दुखू लागले आहेत. सद्यस्थितीत पावसामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे आता डांबरी रस्त्यांवरून ये-जा करताना वाहनचालकांसह नागरिकही त्रस्त झाल्याने उठा.. उठा पाऊस उघडला पठारभागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची वेळ आली असे म्हणण्याची नागरिकांवर दुर्दैवी वेळ आली आहे.
यावर्षी पठारभागात धुव्वादार पाऊस झाला आहे. त्यामुळे डांबरी रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच खड्डे पाहावयास मिळत आहे. या खड्ड्यांमध्ये छोटी-मोठी वाहने आदळत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहे. खड्डे हुकवावे की वाहने चालवावी अशा संकटात वाहनचालक सापडले आहेत. त्यामुळे आता पावसामुळे खराब झालेल्या डांबरी रस्त्यांची कामे कधी करणार असा सवाल नागरिक विचारत आहे.