संगमनेर नगरपालिकेने उभा केला तीन दिवसांत तात्पुरता पूल! प्रवराकाठच्या रहिवाशांची समस्या; पक्क्या पुलासाठी मात्र मोठी प्रतीक्षा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकार्याच्या ‘शहाणपणा’मुळे साईमंदिराकडे जाणारा पूल पंधरवड्यापूर्वी एका बाजूने खचला होता. त्यामुळे प्रवराकाठावरील मोठ्या लोकवस्तीच्या समस्या वाढून तेथील रहिवाशांना तब्बल तीन किलोमीटरचा फेरा मारण्याची वेळ आली होती. त्यातच म्हाळुंगी नदी अद्यापही वाहती असल्याने पुलाचे काम कधी होईल याबाबत कोणतीही स्पष्टता नसताना पालिकेच्या बांधकाम विभागाने अथक प्रयत्नांच्या जोरावर अवघ्या तीनच दिवसांत चक्क वाहत्या पाण्यात तात्पुरता पूल उभा केला आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांसह सराफ विद्यालयाच्या शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी रविवारी (13 ऑक्टोबर) रंगारगल्लीकडून प्रवरानदीकडे जाणारा म्हाळुंगी नदीवरील पूल स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने खचला होता. त्यामुळे पालिकेने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी या पुलाचा वापर बंद करण्यासाठी पुलाकडे जाणार्या मार्गावर अडथळे निर्माण करुन सदरचा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केला होता. या पुलाचा वापर साईनगर, हिरे मळा, घोडेकर मळा, पम्पींग स्टेशन, गंगामाई परिसर व कासारवाडी भागातील शेकडो नागरिक शहरात येण्यासाठी करीत असल्याने त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असतं. त्यातच दिगंबर गणेश सराफ विद्यालय व डॉ. देवेंद्र ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारे शहरातील शेकडो विद्यार्थीही या पुलावरुन जा-ये करीत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती.

ही घटना घडण्यापूर्वी पासूनच म्हाळुंगी नदीच्या पाणलोटात पावसाचा धुमाकूळ सुरु झाल्याने चालू वर्षी म्हाळुंगी नदी अव्याहतपणे वाहत आहे. या दरम्यान नदीला वारंवार पूरही आल्याने प्रवराकाठाकडे जाणार्या मोठ्या पुलाच्या काही अंतरावर साईनगरकडे जाण्यासाठी पूर्वीपासून अस्तित्वात असलेला छोटा कच्चा पुलही वाहून गेला होता. त्यातच गेल्या 13 ऑक्टोबररोजी म्हाळुंगीचा मुख्य पुलही खचल्याने या भागात राहणार्या नागरीकांसह सराफ विद्यालय व ओहरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तब्बल तीन किलोमीटरचा फेरा मारुन कासारवाडी-मालपाणी हेल्थ क्लब रस्ता हा एकमेव पर्याय शिल्लक राहिल्याने या भागात राहणार्या सर्वसामान्य रहिवाशांची मोठी परवड सुरु झाली होती.

गेल्या आठवड्यात या भागातील नागरिकांनी थेट पालिकेत जावून मुख्याधिकार्यांच्या दालनासमोर ठिय्या देत पक्का नाहीतर नाही, पण कच्चा पूल तरी तत्काळ उभारण्याची मागणी केली. मात्र नदीतून पाणी वाहत असल्याने वारंवार प्रयत्न करुनही सिमेंटच्या नळ्या स्थिरावत नसल्याचे मुख्याधिकार्यांनी नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले. या भागातील नागरिक अतिशय सामान्य श्रेणीतील असल्याने अनेकांकडे दुचाकी वाहनांची व्यवस्था नाही, घरात अठरा विश्वाचे दारिद्-य असल्याने रोज रिक्षाचा वापर करणेही अशक्य असल्याचे यावेळी स्थानिकांनी त्यांना सांगितले. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करीत पालिकेने गेल्या रविवारी (ता.27) म्हाळुंगी नदी वाहती असतानाही प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर यंत्रांच्या मदतीने पुन्हा कच्चा पूल उभारण्याचा प्रयत्न सुरु केला.

यावेळी मात्र पाण्याचा प्रवाह आणि वेग दोन्ही कमी असल्याने पालिकेच्या यावेळच्या प्रयत्नांना यश मिळाले. गेली दोन दिवस मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या बांधकाम विभागाने अथक प्रयत्न करुन अखेर चव्हाणपूरा व वाल्मीक वसाहतीकडून म्हाळुंगीकडे येणार्या रस्त्यांना जोडणारा तात्पुरत्या स्वरुपातील पूल उभा करण्यात यश मिळवले. सोमवारी (ता.31) सायंकाळी हा पूल पूर्ण झाल्यानंतर तो नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तूर्त या पुलावरुन दुचाकी, रिक्षा व छोटी वाहने नेता येतील, मात्र एखादे अवजड वाहन या पुलावरुन गेल्यास पात्रात टाकलेल्या सिमेंटच्या नळ्या फुटण्याची शक्यता असल्याने मोठ्या पुलाचे काम पूर्ण होईस्तोवर या पुलावरुन कोणतेही अवजड वाहन, वाळू तस्करांचे ट्रॅक्टर जाणार नाहीत याची स्थानिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी म्हाळुंगीच्या एका बाजूने वाहणारी शहरी गटार तुंबल्याने पालिकेच्या एका आरोग्य अधिकार्याने आपला नसलेला शहाणपणा दाखवित चक्क ब्रेकरचा वापर करुन स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूकडील पुलाच्या खालील टणक भाग कोरुन काढला होता. त्यावेळी दीर्घकाळ वापरल्या गेलेल्या ब्रेकरमुळे पुलाचा पहिल्या क्रमांकाचा पिलर अस्थिर झाला, त्यातच त्याच्या खालच्या बाजूचा टणक भरावही कोरुन काढला गेल्याने यंदा आलेल्या पुराच्या पाण्याने राहिलेला भरावही वाहून नेल्यानेच सदरचा पूल एका बाजूने खचल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यामागील वास्तवाचा शोध घेवून दोषी असलेल्यांवर कारवाईचीही मागणी यानिमित्ताने समोर आली आहे.

