नगर-कोपरगाव महामार्गाचे काम संथगतीने; अपघातांचे प्रमाण वाढले राष्ट्रवादी काँग्रेसची संबंधित ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
नगर-मनमाड महामार्गापैकी नगर ते कोपरगाव या मार्गाचे काम शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी घेतले आहे. गुहा परिसरात चार महिन्यांपासून हे काम सुरू असून सुरक्षाविषयक नियमांचे कोणतेही पालन केले जात नाही. त्यामुळे अपघातात आठ जणांचे बळी गेले गेले असून अनेकजण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुजित वाबळे व ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत पोलिसांना निवेदन देताना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक उर्‍हे, उपसरपंच अविनाश ओहोळ, रामा बर्डे, शिवाजी मांजरे, डॉ. विजय वाबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर निवेदन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना स्वीकारले. चार महिन्यांपासून गुहापाट ते गुहा परिसरात रस्ता डांबरीकरण व सहापदरी विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना कुठेही कामासंदर्भात प्रवासी, वाहनचालक सुरक्षितता यादृष्टीने फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. आजपर्यंत या परिसरात झालेल्या अपघातात आठ प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत.

याबाबत कंपनीला सातत्याने सूचना देऊनही कंपनीने या सुरक्षा नियमांचे पालन केलेले नाही. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा या भागात दौरा असताना कार्यकर्त्यांनी या भागातील अपघाताच्या वाढत्या प्रमाणाविषयीचा प्रश्न त्यांच्याजवळ उपस्थित केला. राज्यमंत्री तनपुरे यांनी कंपनीच्या संबंधित अधिकार्‍यांना तातडीने बोलावून दिशादर्शक कामाच्या फलकाची माहिती देणारे विशेषतः रात्रीही दिसू शकतील, अशा रिफ्लेक्टरमध्ये हे फलक लिहिण्याच्या सूचना केल्या. कंपनीच्या नगर येथील वरीष्ठ अधिकार्‍यांशीही त्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व कामात तातडीने आवश्यक त्या सुधारणा होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. दरम्यान हे काम अत्यंत संथगतीने होत असून दररोज किमान एक तरी अपघात याठिकाणी होतो. एका बाजूने रस्ता पूर्णपणे खोदण्यात आलेला आहे. कुठे तो एकाच बाजूने खुला आहे. मात्र, त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी नियंत्रित करण्यासाठी काहीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे वाहतूक अधिक असुरक्षित, वेळ घेणारी झाली आहे. सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातूनच अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Visits: 5 Today: 1 Total: 29263

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *