… तर रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नाही ः अ‍ॅड.पोळ

… तर रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नाही ः अ‍ॅड.पोळ
घोगरगावमधील ‘क्रांतीस्तंभ काढू’ नयेच्या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनाच्यावतीने मोर्चा
नायक वृत्तसेवा, नेवासा
समाजातील शेवटच्या घटकाला सन्मान मिळवून द्यायचा असेल तर रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नाही, असेा सल्ला लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.नितीन पोळ यांनी दिला.


नेवासा तालुक्यातील घोगरगाव ग्रामपंचायत हद्दीत उभारलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ‘क्रांतीस्तंभ’ काढण्यात येऊ नये म्हणून लोकस्वराज्य आंदोलनाच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलीस व महसूल प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली व स्तंभ काढू नये म्हणून जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेऊन याठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अ‍ॅड.पोळ बोलत होते.


मोर्चाच्या सुरुवातीला हाथरस घटनेतील तरुणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना अ‍ॅड.पोळ म्हणाले की आजही अनुसूचित जातीतील महिला, भगिनी सुरक्षित नाहीत. त्याचप्रमाणे आजही देशात या समाजातील महापुरुषांची व महिला भगिनींची विटंबना होत असून समाजाला आत्मसन्मान मिळवून द्यायचा असेल. आणि आपल्या न्याय्यहक्कांचे संरक्षण करण्यात प्रशासन कुचराई करत असेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असा सल्ला दिला. यावेळी लोकस्वराज्य आंदोलनाच्यावतीने अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे म्हणून समाजातील विविध जिल्ह्यातील व राज्य पातळीवर अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण व्हावे या विषयावर काम करणार्‍या मातंग, मादिग, मांग गारुडी, मेहतर, डककलवार समाजाच्या वीस ते पंचवीस संघटना एकत्र येऊन शासनाला दहा लाख सह्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या मोहिमेची पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात करण्यात आली असून जास्तीत जास्त संघटना व समाज बांधवांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.


यावेळी आंदोलनाचे तालुकाध्यक्ष अरुण कनगरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कनगरे, कडूबाळ कनगरे, धनंजय कनगरे, रोहिदास कनगरे, प्रशांत कनगरे, भावराव कनगरे, कारभारी दणके, सुभाष कनगरे, बाबासाहेब अढांगळे, मनोहर कनगरे, लक्ष्मण कनगरे आदी उपस्थित होते. साहेबराव कनगरे यांनी प्रास्ताविक केले तर नेवासा तालुकाध्यक्ष अरुण कनगरे यांनी आभार मांडले.

Visits: 17 Today: 1 Total: 115261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *