दोनवर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ खंडाळा बंद आरोपीकडून कोणीही वकीलपत्र न घेण्याची ग्रामस्थांची विनंती


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील खंडाळा येथील दोनवर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. निषेध सभेसाठी उपस्थित नागरिकांमध्ये शेतमजुरी करणार्‍या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

खंडाळा ते रांजणखोल या रस्त्यालगत रमाबाईनगर परिसरात असलेल्या भास्कर ढाकू मोरे या 65 वर्षीय वृद्धाने दोनवर्षीय बालिकेवर केलेल्या अत्याचाराचे गावात तीव्र पडसाद उमटले. आरोपीला पोलिसांनी अटक करून गुन्हा जरी दाखल केला असला तरी ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. स्वयंस्फूर्तीने महिला, पुरुष गावात एकवटले व त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेचे आयोजन केले.

या सभेत श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, स्थानिक ग्रामविकास मंडळाचे राधाकिसन बोरकर, नवनाथ ढोकचौळे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अजीज इनामदार, संदीप विघावे, ग्रामपंचायत सदस्या मंजुषा ढोकचौळे, लहानबाई रजपूत, ताराचंद आलगुंडे, खंडेराव सदाफळ, सुरेश विघावे, महेश मरकडे, रामदास म्हसे यांची घटनेच्या निषेधार्थ भाषणे झाली. श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, बाबासाहेब दिघे यांनी पीडित बालिकेच्या घरी भेट दिली. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस व श्रीरामपूर वकील संघाला दिलेल्या सह्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, सदर घटनेच्या निषेधार्थ सर्व व्यापार्‍यांनी व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला. सदर आरोपीचा खटला जलदगती न्यायालयात चालवून लवकर निर्णय व्हावा. वकील संघातील कोणत्याही सदस्याने सदर खटल्यातील आरोपीकडून खटला चालवू नये, अशी विनंती करण्यात आली आहे.

Visits: 102 Today: 1 Total: 1102698

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *