राहुरी पोलिसांकडून वरिष्ठांचा आदेश वारंवार धुडकावल्याचे पुन्हा सिद्ध

राहुरी पोलिसांकडून वरिष्ठांचा आदेश वारंवार धुडकावल्याचे पुन्हा सिद्ध
एक कैदी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने पोलीस वर्तुळात तीव्र नाराजी
नायक वृत्तसेवा, राहुरी
आरोपीच्या अटकपूर्व वैद्यकीय चाचणीबरोबर कोरोना तपासणी करण्याचा वरिष्ठांचा आदेश राहुरीत वारंवार धुडकावला जात असल्याचे सिद्ध होत आहे. इतर कैद्यांबरोबर राहुरी कारागृहात एक रात्र काढलेला एक कैदी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला तातडीने अहमदनगर येथे जिल्हा कारागृहाच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. मागील महिनाभरात अशाच प्रकारामुळे आत्तापर्यंत 37 कैदी व 12 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले. तरी त्याच चुकांची पुनरावृत्ती घडत असल्याने पोलीस वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे एका हॉटेलमध्ये घातक शस्त्राने एका तरुणाला गंभीर मारहाण केल्याप्रकरणी चार दिवसांपूर्वी राहुरी पोलिसांनी चौघा संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांची कोरोना तपासणी करण्यापूर्वी त्यांना कारागृहातील बरॅकमध्ये ढकलण्यात आले. त्यांनी बरॅकमधील इतर कैद्यांबरोबर 28 सप्टेंबरची रात्र काढली. 29 सप्टेंबरला त्यांची कोरोना चाचणी झाली. त्यात एक आरोपी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात पुन्हा एकच धावपळ उडाल्याचे पहायला मिळाले. कोरोनाबाधित आरोपीला रुग्णवाहिकेतून अहमदनगर येथील जिल्हा कारागृहाच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले.


दरम्यान, मागील महिन्यात देसवंडी येथे मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केली होती. त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल येण्यापूर्वी त्यांना कारागृहात डांबण्यात आले. दुसर्‍या दिवशी त्यातील एक कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर आठ दिवसांत कैदी आजारी पडण्यास सुरुवात झाली. तब्बल 37 कैदी, एका वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यासह बारा पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या घटनेच्या महिनाभरात पुन्हा पुनरावृत्ती घडली. पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या कोरोनाविषयी बेफिकीरीबद्दल कारागृहातील कैदी व सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचार्‍यांचा जीव वारंवार धोक्यात येत आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात तीव्र नाराजी पसरली आहे.

Visits: 5 Today: 2 Total: 30626

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *