लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी प्रशासन सज्ज! मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी; टक्का वाढवण्यासाठी विविध उपाययोजना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोमवारी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वाढलेल्या तापमानाचा फटका जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीला बसू नये यासाठीही विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात यंदा 3 हजार 734 मतदान केंद्रांच्या माध्यमातून 36 लाख 59 हजार 201 मतदार आपले पवित्र कर्तव्य बजावणार असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील 50 टक्के मतदान केंद्र त्या-त्या ठिकाणच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या मोबाईलशी इंटरनेटद्वारा जोडण्यात आले आहेत. यावेळी मतदार अथवा उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधींनाही मतदान कक्षात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. संगमनेर विधानसभा मतदार संघात 278 मतदान केंद्र असून तेथील तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक भारतीय नागरीकाने लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होवून मोठ्या प्रमाणात मतदानाचे कर्तव्य बजवावे असे आवाहन संगमनेरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.

सोमवारी (ता.13) लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडणार आहे. गेल्या तीन टप्प्यात घसरलेला मतदानाचा टक्का विचारात घेवून केंद्रीय निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या उपाययोजना सूचविल्या असून त्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनीही देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी मतदार जागृतीचा वापर केला जात आहे. शिवाय 85 वर्षांवरील वयोवृद्ध व 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोयही करण्यात आली होती. सार्वत्रिक मतदानाच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व 3 हजार 734 मतदार केंद्रांचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून उन्हाचा त्रास होवू नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत.


जिल्ह्यातील दक्षिण लोकसभा मतदार संघात भाजपचे डॉ.सुजय विखे पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नीलेश लंके यांच्यात थेट लढत होणार असली तरीही या मतदार संघात त्यांच्यासह एकूण 25 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. तर, शिर्डी मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे व उबाठा गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्यातच खर्‍या लढतीचा अंदाज असला तरीही वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांनी दोघांचीही धाकधूक वाढवली आहे. या मतदार संघात या तिघांसह एकूण 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज (ता.11) सायंकाळी या दोन्ही मतदार संघातील प्रचाराच्या तोफाही थंडावणार आहेत.


उन्हाच्या तीव्रतेने घटलेल्या टक्केवारीत सुधारणा करण्यासाठी संगमनेरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी संगमनेर तालुक्यातील 278 आणि अकोले तालुक्यातील 307 अशा एकूण 585 मतदार केंद्रांचे बारकाईने नियोजन केले असून शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागात त्यांची विभागणी केली आहे. शहरी भागातील मतदान केंद्र इमारतींमध्ये असल्याने उष्णतेमूळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता कमी आहे. मात्र ग्रामीणभागातील बहुतांशी मतदान केंद्र जिल्हा परिषदेच्या पत्र्यांच्या शाळांमध्ये होत असल्याने आणि मतदारांना प्रतिक्षा करण्यासाठी सावलीची वाणवा असल्याने मतदान करण्यात टाळाटाळ होत असल्याचे निरीक्षण समोर आले होते. त्यासाठी ग्रामीण भागासह ज्या मतदान केंद्रांवर पत्रे आहेत अशा सर्व ठिकाणी पत्र्यांवर पाचाट टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या-त्या गावांच्या ग्रामसेवकांवर सोपवण्यात आली आहे.


शिवाय मतदारांना प्रतिक्षा करण्यासाठी आता उन्हातील रांगांमध्ये उभे रहावे लागणार नाही. त्याच शाळेतील अतिरीक्त खोल्यांचा वापर करुन तेथे मतदारांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेथे अतिरीक्त खोल्या नाहीत अशा ठिकाणी उन्ह आणि अवकाळी पाऊस यांचा विचार करुन मांडव घातला गेला आहे. प्रत्येक मतदान केंद्रात स्वच्छ व थंड पाण्याचे जारही ठेवले जाणार असून प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला गेला आहे. अनेक शाळांमधील खोल्यांमध्ये पंख्यांचा अभाव असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने अशा सर्व खोल्यांमध्ये नव्याने पंखे बसवले असून नादूरुस्त असलेले पंखेही दुरुस्त करण्यात आले आहेत. दिव्यांग मतदारांना सोयीचे व्हावे यासाठी व्हिल चेअरचीही (सायकल खुर्ची) व्यवस्था करण्यात आली आहे.


यावेळी मतदार अथवा उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी यांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमाचे पालन न करणार्‍यांवर कारवाई होणार आहे. संगमनेर व अकोले या दोन्ही विधानसभा मतदार संघातील मतदानपूर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज आहे. संगमनेर तालुक्यात एकूण 278 मतदान केंद्र असून प्रत्येक केंद्रावर पाच मतदान कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी नेमण्यात आला आहे. मतदान केंद्रांच्या कर्मचार्‍यांची व निवडणूक साहित्याची वाहतूक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 44 बसेस आणि एका जीपचा वापर केला जाणार आहे.


शहरातील गणेशनगरमध्ये असलेल्या आंबरे पाटील विद्यालयाचे मतदान केंद्र महिलांना समर्पित असणार आहे. या केंद्राला ‘पिंक’ समजले जाणार असून केंद्रात गुलाबी रंगाचा वापर करुन सजावट व सेल्फी पॉईंटही उभारला जाणार आहे. या केंद्रावरील सर्व कर्मचारी महिला असतील, मात्र मतदान त्या प्रभागातील कोणत्याही मतदाराला करता येईल. कासारा दुमाला व शहरातील मालपाणी विद्यालयाचे मतदान केंद्र आदर्श म्हणून संबोधले जाणार आहे. या केंद्रावर मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. दिव्यांगासाठी घुलेवाडी व युवा मतदारांसाठी सह्याद्री विद्यालय केंद्र असणार आहे.


संगमनेर विधानसभा मतदार संघात 85 वर्षांवरील 93 व 40 टक्क्यांवरील 17 दिव्यांग अशा एकूण 110 मतदारांनी गृह मतदानाची मागणी केली होती. त्यानुसार त्यांची मतदान प्रक्रिया राबविली गेली. त्यातील 102 मतदारांनी (92.72 टक्के) आपला हक्क बजावला तर, पाच जणांनी नाकारला आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेत असलेल्या 1 हजार 557 अधिकारी व कर्मचार्‍यांचे पोस्टल मतदान घडवून घेतले जात आहे. यावेळी संगमनेर तालुक्यातील 140 व अकोले तालुक्यातील 154 मतदार केंद्र वेबकास्टिंगद्वारा थेट सहाय्यक निवडणूक अधिकारी व या प्रक्रियेतील अन्य अधिकार्‍यांच्या मोबाईलशी थेट जोडली जाणार आहेत. उन्ह आणि पाऊस या दोन्ही गोष्टींचा मतदारांना त्रास होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतली आहे. मतदारांनीही उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून मतदानाचे पवित्र कर्तव्य बजवावे व लोकशाही अधिक सदृढ करावी. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्याचा मतदानाचा आकडा 75 टक्क्यांच्या पुढे नेण्याचा संकल्प केला आहे, त्याला संगमनेर व अकोले तालुक्यातील मतदारांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा ही विनंती.
शैलेश हिंगे
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, संगमनेर-अकोले विधानसभा

Visits: 29 Today: 1 Total: 115926

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *