वाहतूक वळविल्याने श्रीरामपूर-नेवासा रस्त्याची लागणार वाट अवजड वाहतुकीमुळे मिळणार अपघातांना निमंत्रण; नागरिकांचा विरोध


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अहमदनगर ते कोपरगाव या नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर व कोपरगावकडून येणारी जड वाहतूक श्रीरामपूर नेवासामार्गे औरंगाबाद-नगर महामार्ग अशी वळविण्यात आली आहे. या मार्गावरील रस्ते अगोदरच पावसामुळे खराब झालेले आहेत. त्यात ही वाहतूक वळविल्याने या रस्त्यांची पूर्णपणे वाट लागणार आहे. अहमदनगर-कोपरगाव रस्ता चांगला होईलच. परंतु श्रीरामपूर-नेवासा हा रस्ता सध्या असलेल्या नगर-कोपरगाव रस्त्यापेक्षा भयानक होणार असल्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

अहमदनगर ते कोपरगाव महामार्ग दुरुस्तीच्या करणास्तव संगमनेर व कोपरगावकडून येणारी वाहतूक पर्यायी मार्ग म्हणून श्रीरामपूरमार्गे नेवासा व पुढे औरंगाबाद-नगर मार्गाने वळविण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील मार्ग नुकतेच थोड्या फार प्रमाणात सुधारलेली असताना या पर्यायी वाहतुकीमुळे तो मार्ग देखील खिळखिळा होण्यास वेळ लागणार नाही. या पर्यायी वाहतुकीमुळे श्रीरामपूर शहरात मोठी वाहतूक को़ंडी होत असून अवजड वाहनांमुळे अपघात होऊन नागरिक दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अगोदरच श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणामुळे रस्ते लहान झाले असून त्यात ही अवजड वाहतूक म्हणजे अपघातास निमंत्रणच! तसेच येणार्‍या काळात दिवाळी असल्यामुळे शहरातील ज्या मार्गावर गर्दी असते. या गर्दीतून अशी वाहतूक जाणे म्हणजे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे वाद-विवाद हा प्रश्न पुढे उभा राहतो. तोच मार्ग नेवाशाकडे जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन शहरातील वातावरण खराब होऊन वायू प्रदूषण देखील वाढणार आहे. बाभळेश्वर मार्गे श्रीरामपूर ते टाकळीभान लोखंडी फॉलपर्यंतचा रस्ता नुकताच रुंदीकरणात मोठा करण्यात आलेला आहे. मात्र या पर्यायी अवजड वाहतुकीमुळे या सर्व मार्गाची देखील वाट लागणार आहे. या मार्गाची वाताहत झाल्यावर तो पुन्हा दुरुस्त कोण करून देणार असा प्रश्न भाजपचे राजेंद्र कांबळे, राम पटारे, संजय पांडे, मारुती बिंगले यांनी उपस्थित केला आहे.

Visits: 5 Today: 1 Total: 27337

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *