अकोले तालुक्यात कोरोना विषाणूंनी घेतला नववा बळी!
अकोले तालुक्यात कोरोना विषाणूंनी घेतला नववा बळी!
प्रथमच डॉक्टर कोरोनाबाधित सापडले; आलेख पोहोचला 323 वर
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले शहरातील कारखाना रस्ता परिसरातील एका 71 वर्षीय कोरोनाबाधित वयोवृद्ध व्यक्तीने बुधवारी (ता.19) पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे अकोले तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे नववा बळी गेला असून मंगळवारी दिवसभरात 22 व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 323 वर गेली आहे.
अकोले शहरातील साखर कारखाना रस्ता परिसरातील एका 71 वर्षीय व्यक्तीला 15 ऑगस्ट, 2020 रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून त्याच्यावर घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार चालू होते. बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ झाली आहे. मंगळवारी संगमनेर शहरातील मालपाणी कोविड सेंटरमधील अहवालात हिवरगाव आंबरे येथील 40 वर्षीय, 42 वर्षीय, 72 वर्षीय व 21 वर्षीय महिला आणि 35 वर्षीय, 20 वर्षीय, 15 वर्षीय पुरूष व 4 वर्षीय मुलगी अशा आठ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे हिवरगाव आंबरे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. त्यानंतर खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार शहरातील एक 48 वर्षीय डॉक्टर, औरंगपूर येथील 40 वर्षीय महिला व हिवरगाव आंबरे येथील 57 वर्षीय पुरूष अशा तीन व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच खानापूर कोविड सेंटरमधून घेण्यात आलेल्या 44 व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या अहवालात मेहेंदुरी येथील 68 वर्षीय, 32 वर्षीय व 20 वर्षीय पुरूष आणि 45 वर्षीय महिला अशा चार तर कोतूळ येथील 30 वर्षीय महिला, कळस येथील 37 वर्षीय महिला, मनोहरपूर येथील 60 वर्षीय महिला व 12 वर्षीय मुलगा आणि पिंपळगाव खांड येथील 60 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरूष अशा एकूण दहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात घोडसरवाडी येथील एका 71 वर्षीय वृध्दाचा कोरोना अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आला आहे. यामुळे तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या 323 झाली असून पैकी सध्या 95 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तर 218 व्यक्तींची यशस्वी उपचारांती घरवापसी झाली आहे.