प्रशासनाचा हलगर्जीपणा वाढवतोय संगमनेरचा कोविड आलेख! जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित पाचव्या दिवशीच दिला जातोय रुग्णांना डिस्चार्ज

श्याम तिवारी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लक्षणे असलेल्यांपासून ते लक्षणे नसलेल्यांपर्यंत सर्वांसाठी आयसोलेशन व क्वॉरंटाईनची मर्यादा ठरलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी सविस्तर आदेशही बजावले आहेत. संगमनेरात मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असून येथील प्रशासकीय अधिकारी मनमानी पद्धतीने कोविडचा सामना करीत आहेत. त्याचा फटका मात्र सामान्य संगमनेरकरांना बसत असून दररोज तालुक्याच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केवळ सूचना आणि आदेशांची रास मांडणार्या स्थानिक प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे संगमनेरकरांमध्ये आता संताप उसळू लागला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणीही होवू लागली आहे.

राज्य शासनाने संक्रमित रुग्णांची सौम्य, मध्यम आणि गंभीर अशी तीन प्रकारात वर्गवारी करुन त्याबाबतच्या उपचार व सुधारित डिस्चार्ज पद्धतीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये त्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी गेल्या महिन्यातच 25 जुलैरोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सुधारित आदेश जारी केले होते. त्या आदेशानुसार जिल्ह्यातील एखाद्या रुग्णांस लक्षणे दिसल्यास त्याचा स्त्राव घेतल्यापासून त्याचा कोविड अहवाल प्राप्त व्हायला तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. त्यामुळे नवीन निर्देशानुसार कोरोना संक्रमित रुग्णांना डिस्चार्ज देण्याची आवश्यकता दर्शविण्यात आली होती. या आदेशाचे पालन करण्याबाबतही सक्तीच्या सूचना करण्यात आल्या होत्या. संगमनेरात मात्र त्या आदेशासह सर्व सूचनांना हरताळ फासण्यात आला आहे.

सौम्य, अति शौम्य, लक्षणेपूर्व व लक्षणेच नसलेल्या कोविड बाधितांचे दैनंदिन शारीरिक तापमान व शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यात यावी. अशा रुग्णांचा स्वॅब घेतल्यापासूनच्या सातव्या दिवसानंतर (त्यातील 5, 6 व सातव्या दिवशी त्याला ताप व ऑक्सिजनची कमतरता न भासल्यास) त्याला डिस्चार्ज देण्यात यावा व त्यानंतर पुढील सात दिवस त्याला गृह विलगीकरणात ठेवावे.
हाय रिस्क श्रेणीतील व्यक्तिंचे स्वॅब घेतल्यानंतर त्यांना घरी न सोडता अहवाल प्राप्त होईस्तोवर कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावे असे आदेश देण्यात आलेले आहेत. संगमनेरात मात्र अनेक प्रकरणात या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

25 जुलैरोजी जारी झालेल्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये सौम्य, अतिसौम्य, लक्षणे पूर्व व लक्षणे नसलेले अशी कोरोना बाधितांची वर्गवारी करण्यात आली होती. या प्रकारातील सर्व रुग्णांचे दैनंदिन शारीरिक तापमान व ऑक्सिजन मर्यादा तपासण्यात यावी असे निर्देश देण्यात आले होते. सदर रुग्णांचा स्त्राव घेतल्यापासून पुढील सात दिवसानंतर (5, 6 व 7 व्या दिवशी ताप नसल्यास तसेच ऑक्सिजन पातळी 95 टक्क्यांपेक्षा कमी नसल्यास) डिस्चार्ज देण्यात यावा असे स्पष्ट बजावण्यात आले होते. अशा रुग्णांची सातव्या दिवसानंतर कोविड चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचेही नमूद करण्यात आले होते.

उपचारानंतर घरी जाणार्या रुग्णांना त्यापुढील सात दिवस घरातच विलगीकरणात राहण्याचेही बंधन या आदेशातून अधोरेखीत करण्यात आले होते. या कालावधीत रुग्णांनी स्वतः आपले दैनंदिन निरिक्षण नोंदवून ताप, खोकला किंवा श्वसनास त्रास जाणवल्यास कोविड केअर सेंटरशी संपर्क साधण्यासही सांगण्यात आले होते. मध्यम स्वरूपाची लक्षणे असणार्या आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या बाबतीत ज्या रुग्णांचा ताप पहिल्या तीन दिवसांत नियंत्रित होवून त्यापुढील चार दिवसांत त्यांची ऑक्सिजन पातळी 95 टक्क्यांवर संतुलित हाईल अशा रुग्णांना लक्षणे दिसल्यापासून दहाव्या दिवशी ताप नसेल, श्वसनाचा त्रास नसेल आणि कृत्रिम ऑक्सिजनची गरज नसेल तेव्हाच त्यांना डिस्चार्ज देण्याबाबत व त्यानंतरही सात दिवस गृह विलगीकरणात रहाण्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले होते.

गंभीर रुग्णांच्या बाबतीत तो रुग्ण पूर्णतः स्थिर झाल्याशिवाय व दहा दिवसांनंतर त्याची पुन्हा स्त्राव चाचणी करुन अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय त्यांना डिस्चार्ज न देण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. अशा व्यक्तिंना मुदतपूर्व घरी जाता येणार नाही व घरातच आयसोलेटही होता येणार नाही. या उपरांतही असे घडल्यास त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्याबाबतही अगदी स्पष्टपणे निर्देश देण्यात आले होते. संगमनेरात मात्र स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकार्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवित हरताळ फासला आहे.

सौम्य, अतिसौम्य, तीव्र अथवा गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांच्या बाबतीत कमीतकमी सात दिवस रुग्णालयातच ठेवण्याची बाब या आदेशातून अगदी सुस्पष्ट असतांनाही संगमनेर तालुक्यात आढळणार्या अनेक रुग्णांना पाचव्या दिवशीच रुग्णालयातून घरी सोडण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. बाधिताच्या संपर्कात आलेल्या व 26 जुलैरोजी त्यांचे अहवालही पॉझिटिव्ह असलेल्या अशा तीन महिलांना रविवारी (ता.30) अवघ्या पाचव्याच दिवशी घरी सोडण्यात आले. या प्रकाराने त्या परिसरात खळबळ उडण्यासोबतच संतापही निर्माण झाला आहे.

याशिवाय रुग्णाच्या संपर्कातील ‘हाय रिस्क’ श्रेणीत मोडणार्या व्यक्तिंचे स्त्राव घेतल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होईस्तोवर त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याबाबतही स्पष्टता आहे. मात्र संगमनेरात याकडे संतापजनक पद्धतीने दुर्लक्ष होत असून अनेकजण तपासणीसाठी स्त्राव देवून थेट घरी निघून जात आहे. त्यामुळे त्यांचा मुक्तसंचार अनेकांना बाधित करीत असून सध्या तालुक्यातील काही कुटुंब अशाच धक्कादायक प्रकारांना बळी पडली आहेत. या संपूर्ण घटनाक्रमात स्थानिक प्रशासनासची मनमानी आणि अक्षम्य हलगर्जीपणा यामुळे संगमनेरातील कोविडची स्थिती अत्यंत धक्कादायक वळणावर पोहोचली असून तालुक्याची रुग्णसंख्या वाढण्यात हाच प्रकार कारणीभूत ठरल्याचीही जोरदार चर्चा सुरु असून नागरिकांमधून संतापही व्यक्त होत आहे.

“ केवळ दंडात्मक कारवाईसाठी अग्रेसर असलेल्या संगमनेर नगरपालिकेचा हलगर्जीपणाही या प्रकारात समोर आला आहे. बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरात सॅनिटायझरचा टँकर नेवून संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र पालिकेला अद्यापही कोविडचे गांभिर्यच समजल्याचे दिसत नाही. त्यामुळे रुग्ण आढळल्यापासून तो बरा होईपर्यंत अनेक भागात सॅनिटायझेशनच झालेले नसल्यानेही बाधितांचा आकडा वाढण्यास मदत मिळाल्याची शहरात चर्चा सुरु आहे.

“ शासनाने कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे सौम्य, मध्यम आणि गंभीर अशा तीन भागात वर्गीकरण करुन उपचाराचे नियम व उपचारांती घरी सोडण्याचे धोरण निश्चित केले असून त्याची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने अगदी सौम्य (लक्षणे नसलेले) रुग्णालाही स्त्राव घेतल्यापासून पुढील सात दिवस कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये ठेवले जाणे अपेक्षित आहे. तसेच हाय रिस्कमधील व्यक्तिंचे स्त्राव घेतल्यानंतर अहवाल प्राप्त होईस्तोवर त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जाणे अपेक्षित आहे. संगमनेरात मात्र काही प्रकरणांत या दोन्ही नियंमांना तिलांजली वाहण्यात आली आहे.

