बनावट शपथपत्राचे लोण आता कोपरगावमध्ये! शपथपत्रांची चौकशी करुन अहवाल करणार सादर
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाने बनावट शपथपत्र दाखल केल्याचा आरोप शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी केला असून त्याचे लोण कोपरगावपर्यंत पोहोचले आहे. याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव येथे दाखल झाले. याबाबत त्यांनी अनेक शिवसैनिकांची कसून चौकशी सुरू केल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबद्दल तात्पुरता निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या महिन्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आलं आहे. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील दोन्ही गटांना पोटनिवडणुकीत वापरता येणार नाही. शिंदे गटाकडून सात लाख तर ठाकरे गटाकडून अडीच लाख शपथपत्रे सादर करण्यात आले होते.
यामध्ये महाराष्ट्रातील 4500 बनावट शपथपत्र आढळल्या प्रकरणी गुन्हे शाखेचे पथक कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक आणि पालघर सोबतच इतर ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणात निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव येथे दाखल झालेले असून याबाबत बुधवारी (ता.12) दिवसभर चौकशी केली. गुरुवारी उर्वरित शपथपत्रांची चौकशी करुन अहवाल मुंबई येथे देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.