कळसूबाई शिखराची अवघ्या 42 मिनिटांत चढाई बारी येथील महाविद्यालयीन तरुणाने मोडला स्वतःचाच विक्रम


नायक वृत्तसेवा, अकोले
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून प्रसिद्ध असणार्‍या कळसूबाई शिखराची चढाई अवघ्या 19 व्या वर्षात 42 मिनिटांत पूर्ण करत बारी येथील युवकाने स्वतःचाच विक्रम केला आहे.

अकोले तालुक्यात पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कळसूबाईचे शिखर ओळखले जाते. समुद्र सपाटीपासुन 1646 मीटर उंच असलेल्या या शिखराची चढाई म्हणजे भल्या-भल्या गिर्यारोहकांची दमछाक होते. साधारणतः हे शिखर सर करण्यासाठी गिर्यारोहक व सामान्य माणूस यांना कमीत कमी दोन ते अडीच तासाचा कालावधी लागतो; परंतु या चढाईसाठी बारीतील साजन तान्हाजी खाडे या 19 वर्षीय तरुणाने मात्र अवघ्या 42 मिनिटांत हे शिखर सर केले आहे. साजन हा प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. 2017-18 या वर्षी त्याने वारंघुशी मॅरेथॉनही जिंकली होती. शाळेमध्ये खेळांच्या बाबतीत कायमच तान्हाजीची आघाडी असते. परिसरातील गड किल्लेही महिन्यातून दोन-तीनदा हा आपल्या पायाखाली टाकत सह्याद्रीची भटकंती करत असतो.

यापूर्वीही साजनने एकदा 50 मिनिटे तसेच 46 मिनिटांत कळसूबाई शिखर सर करण्याचा पराक्रम केला होता; परंतु आता केवळ 42 मिनिटांत कळसूबाई सर करत साजनने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. बारी (जहागिरदारवाडी) येथील गोपाळ कुंडलिक करटुले व सोमनाथ एकनाथ घोडे यांनी कळसूबाई शिखर 47 मिनिटांत सर करत परत तळाशी अवघ्या 27 मिनिटांत येण्याची किमया केलेली आहे. याबद्दल साजनचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Visits: 356 Today: 3 Total: 1957456

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *