डोळासणे महामार्ग वाहतूक पोलिसांकडून ‘रस्ता सुरक्षा अभियाना’स प्रारंभ वाहतुकीविषयी नागरिक व वाहनचालकांचे परिणामकारकरित्या प्रबोधनाचा उद्देश

नायक वृत्तसेवा, घारगाव
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार 24 तास अहोरात्र राज्याचे पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी उभे राहतात. यामध्ये वाहतूक पोलिसांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असते. वारंवार उपाययोजना करुन आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी प्रबोधन करुनही वाहनचालक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून ‘रस्ता सुरक्षा अभियाना’चे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यावर्षीही आयोजन करण्यात आले असून, संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील डोळासणे महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राकडून सोमवारी (ता.18) 32 व्या सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला.

डोळासणे महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडत आहे. सोमवारी डोळासणे येथे 32 व्या सप्ताहाचे व महामार्ग सुरक्षा चित्ररथाचे उद्घाटन डॉ.राधेश्याम गुंजाळ मेडीकल कॉलेज व इन्स्टिट्युटचे संचालक तथा प्रा.डॉ.सूरज ढगे, डॉ.जयंत मिंढे, कर्जुले पठारचे सरपंच रवींद्र भोर, माजी सरपंच संदीप भागवत, पांडुरंग उंडे, बाबुराव रहाण, नीलेश आगलावे, बाळासाहेब वाळुंज, विजय वाळुंज व मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शिंदे, हवालदार नारायण ढोकरे, सुनील साळवे, साईनाथ दिवटे, पोलीस नाईक रमेश शिंदे, कैलास ठोंबरे, संजय मंडलिक, भारत गांजवे, उमेश गव्हाणे, योगीराज सोनवणे, अरविंद गिरी, नंदकुमार बर्डे, मनीष शिंदे, पंढरीनाथ पुजारी, एकनाथ लिंबोरे यांनी महामार्गावरील अपघातांची कारणे, उपाय, नागरिकांची जबाबदारी व कर्तव्ये याची माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुणे डॉ.सूरज ढगे व संदीप भागवत यांनीही मार्गदर्शन केले.

देशात दरवर्षी साधारणपणे 5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये जवळपास दीड लाख नागरिक अपघातात मृत्यूमुखी पडतात. तर तेवढेच गंभीर जखमी होतात. अपघात व अपघाती मृत्यूंच्या संख्येत आपले राज्य पहिल्या तीन राज्यांत आहे. ही अपघातांची संख्या कमी करण्यासाठी राज्य शासन दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करते. यावर्षीही सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे परिक्षेत्रीय विभागाचे आयोजन महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांसह इतर वरीष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. याद्वारे नागरिकांचे व वाहनचालकांचे परिणामकारकरित्या प्रबोधन होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.

Visits: 189 Today: 1 Total: 1981410

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *