आता अकोल्यातील पोलीस नाईक ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला! पो.ना.संतोष वाघ याला दहा हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडल्याने पोलीसदलात खळबळ


नायक वृत्तसेवा, अकोले
जिल्हा पोलीस दलाच्या मागे लागलेले भ्रष्टाचाराचे भूत काही केल्या खाली उतरण्याचे नाव घेईना. दोनच दिवसांपूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा अजूनही सुरु असतांनाच त्याचे लोण आता अकोले पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला संतोष वाघ हा लाचपोर पोलीस नाईक आज नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. त्याला पैशांसह ताब्यात घेण्यात आले असून एसीबीचे पथक त्याची कसून चौकशी करीत आहे. या वृत्ताने जिल्हा पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


याबाबत दैनिक नायकला मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका शेतकर्‍याचा जमीनीबाबत परस्परांशी वाद सुरु होता. तो वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून झटपट मार्ग निघावा यासाठी प्रयत्नात असलेल्या त्या शेतकर्‍याची निकड पाहून संबंधित लाचखोर पोलीस नाईक संतोष वाघ याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे आजरोजी पैसे देण्याचेही निश्‍चित झाले. त्या दरम्यान संबंधित शेतकर्‍याने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिकच्या पथकाने आज दुपारच्यावेळी अकोले पोलीस ठाण्यात सापळा लावला. यावेळी संबंधित पोलीस कर्मचारी 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला.


लाचखोर पोलीस नाईक संतोष वाघ याने लाचेचे रक्कम स्विकारताच एसीबीच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला पैशांसह ताब्यात घेतले. त्यानंतर काहीकाळ अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर त्याची चौकशी केल्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून त्यानंतर त्याच्या अटकेची प्रक्रीया सुरु होणार आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत संगमनेर व अकोले तालुक्यातील पोलीस ठाणी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहण्यासोबतच संगमनेर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राणा प्रतापसिंह परदेशी व पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख लाच स्विकारतांना पकडले गेले, आता त्याचे लोण अकोल्यातही पोहोचल्याने जिल्ह्याच्या पोलीस वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Visits: 336 Today: 2 Total: 1867863

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *