वाळू लिलावासह डेपोला मुळाकाठ गावांचा तीव्र विरोध गावे बंद ठेवून करजगाव रस्त्यावरील चौकात रास्ता रोको
नायक वृत्तसेवा, नेवासा
शासनाने जाहीर केलेल्या अंमळनेर (ता.नेवासा) येथील मुळा नदी पात्रातून वाळू लिलाव व निंभारी येथील वाळू डेपोच्या विरोधात मुळाकाठ परिसरातील गावांनी गाव बंद ठेवून शनिवारी (ता.13) सकाळपासून करजगाव-नेवासा रस्त्यावरील लक्ष्मीआई चौकात रास्ता रोको सुरू केला आहे. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा हजर झाला होता.
शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत तहसीलदार संजय बिरादार, सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी उपोषणस्थळी येत ग्रामस्थांशी चर्चा केली होती. मात्र चर्चेअंती कुठलाही निर्णय न झाल्यामुळे व तहसीलदार यांनी लेखी आश्वासन न दिल्याने ग्रामस्थ आंदोलनावर ठाम राहिल्याने प्रशासन व ग्रामस्थ यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवरच शनिवारी सकाळपासून मुळाकाठ परिसरातील सर्व गावे बंद ठेवून लक्ष्मीआई चौकात रास्ता रोको आंदोलनामध्ये अंमळनेर, निंभारी, करजगाव, पानेगाव, शिरेगाव, खेडले-परमानंद, गोमळवाडी, वाटापूर, खुपटी तसेच राहुरी तालुक्यातील वांजुळपोई, तिळापूर, मांजरी, तसेच मुळाकाठ परिसरातील गावातील ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. वाळू लिलाव व डेपो लिलाव कायमस्वरुपी बंद करण्यासाठी संपूर्ण मुळा नदीकाठ एकवटला असून नदी पात्रातून वाळूचा एकही खडा उचलू न देण्याचा निर्धार मुळाकाठच्या ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे भविष्यात जिल्हा प्रशासन व मुळाकाठ परिसरातील ग्रामस्थ यांच्यामध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.