खासदार लोखंडेंच्या कार्यकर्त्यांना महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण शहापूर शहराजवळील घटना; परिसरात काही काळ तणावाचे वातावरण

नायक वृत्तसेवा, नगर
मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांना जाताना शहापूरजवळ शिवसेना नाशिक शहर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भर रस्त्यात चोप दिल्याची घटना घडली आहे. यातील कार्यकर्ते हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते.

सदाशिव लोखंडे यांच्याकडेही शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी होती. त्यानुसार त्यांचे श्रीरामपूर, शिर्डी, संगमनेर, अकोले भागातील कार्यकर्ते घोटी मार्गे मुंबईला रवाना झाले आहेत. त्यातील एका गाडीतील कार्यकर्त्यांसंबंधी ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. मात्र, यातील कार्यकर्ते शिवसेनेतील लोकांच्याही फारसे परिचयाचे नसल्याचंही सांगण्यात आले. ज्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली ती गाडी अहमदनगर जिल्ह्यातील एमएच 16 पासिंगची आहे. तर गाडीवर शिंदे यांनी मेळाव्यासाठी तयार केलेले पोस्टर आहे.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅव्हल्स बसमध्ये बसलेल्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडे बघून हातवारे केल्याच्या आरोपातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यांनी गाडी थांबवून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना वाहनातून उतरवले आणि मारहाण केली. शहापूर शहराजवळ ही घटना घडली आहे. या मारहाण प्रकरणानंतर शहापूर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
