‘फेसबुक’ मैत्रीतून अकोल्यातील आणखी एका युवतीवर अत्याचार! प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सैन्य दलातील तरुणाने दुसर्‍याच मुलीशी विवाह उरकला..

नायक वृत्तसेवा, अकोले
आधुनिक तंत्रज्ञानाने जगाला माणसाच्या बोटांवर आणले आहे. मोबाईलसारख्या माध्यमातून तर माणूस कधीही आणि कोठूनही जगातील कोणत्याही कोपर्‍यात असलेल्या व्यक्तिशी अगदी सहज संपर्क साधू शकतो. उद्योग आणि व्यवसायांच्या बाबतीतही या तंत्रज्ञानाने मोठे बदल घडविल्याने मानवाला आता जगही ठेंगणे वाटू लागले आहे. मात्र मानवी जीवनात क्रांती घडवणार्‍या तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही असल्याचे वारंवार समोरही आले आहे. अलिकडच्या काळात अकोले तालुक्यातील एकामागून एक घटनांनीही या गोष्टीवर मोहोर उमटविली आहे. गेल्या पंधरवड्यात कळसच्या एका तरुणाचा याच तंत्रज्ञानाच्या आडून बळी गेला. त्याच्या वेदनेतून अकोलेकर सावरत असताना आता सैन्यदलातील जवानाने समाज माध्यमातून जवळीक साधत लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार करुन भलतीशीच संसार थाटल्याचे वृत्त येवून धडकले आहे. त्यामुळे एकामागून एक धक्कादायक घटनांतून निसर्ग सौंदर्याने फुललेले अकोले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या अकोले तालुक्यातील कोहडी येथील किरण दिघे या जवानाने फेसबुक या समाज माध्यमाद्वारे तालुक्यातील एका तरुणीशी ओळख करुन व नंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यासाठी त्याने तरुणीच्या कुटुंबियांचाही विश्वास संपादन केला व त्याचा गैरफायदा घेवून त्या तरुणीला पर्यटनाच्या नावाने जिल्ह्यात विविध ठिकाणी नेवून शारीरिक संबंध केले. तरुणीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार देत त्या तरुणीशी नाते तोडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरुणीने अकोले पोलीस ठाण्यात धाव घेवून वरील आशयाची फिर्याद दाखल केली. त्यानुसार संबंधित जवानावर दीड वर्षांपूर्वी अत्याचाराचा गुन्हाही दाखल झाला होता.

सदरचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र त्या दरम्यानच किरण दिघे या जवानाने दुसर्‍या मुलीशी विवाह करुन आपला संसार थाटला आहे. याबाबतची फिर्याद घेवून पीडित तरुणी वारंवार अकोले पोलिसांकडेही गेली, मात्र कायदेशीर दृष्टीकोनातून संबंधित जवानाला लग्न करण्यापासून रोखता येत नसल्याने अकोले पोलिसांकडून त्या तरुणीची समजूत काढण्याचाही प्रयत्न झाला. त्या तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार न्यायालयात सुनावणी सुरु असून लवकर न्याय मिळेल असेही पोलिसांकडून तिला सांगण्यात आले. मात्र जोपर्यंत न्यायालयाचा निकाल होत नाही तोपर्यंत त्याचे लग्न होवू नये अशी त्या तरुणीची मागणी आहे. मात्र तिची मागणी पूर्ण करण्यास पोलीस असमर्थ असल्याने तिने एका राजकीय पक्षाकडे धाव घेतली.

या अत्याचार प्रकरणाबाबत भारतीय ट्रायबल पार्टीच्या अहमदनगर जिल्हा प्रभारी डॉली डगळे यांनी वरीलप्रमाणे घटनाक्रम सांगणारे पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्यानुसार त्यांनी पीडित तरुणीला जलद न्याय मिळावा यासाठी सदरचा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करावा, तसेच जोपर्यंत या खटल्याचा निकाल समोर येत नाही तोपर्यंत संबंधित आरोपीचे लग्न रोखावे. कारण त्याने पीडित तरुणीशी लग्नाचे अमिष दाखवूनच संबंध ठेवले होते. या जवानावर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल असूनही आणि पुढील काळात या खटल्याचा निकाल येणार असल्याचे माहिती असूनही त्याचा होणारा विवाह संशयास्पद असल्याची शंका व्यक्त करताना लग्न होत असलेल्या तरुणीला या जवानाचे कारनामे माहिती आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.


समाज माध्यमातून ओळख करुन नंतर त्यांची फसवणूक करण्याच्या एकामागून एक घटना तालुक्यातून समोर आल्या आहेत. अलिकडच्या काळात कळस येथील तरुणाचा हनीट्रॅप प्रकरणातून गेलेला दुर्दैवी बळी, फेसबुकवरुन माहिती काढून तालुक्यातील काही प्रतिष्ठीत शेतकर्‍यांना आपल्या जाळ्यात ओढणारे ‘हनीट्रॅप’ प्रकरण, प्रेम प्रकरणातून आंतरजातीय विवाह आणि नंतर फसवणुकीचा गणोर्‍यातील प्रकार आणि आता चक्क सैन्यदलातील जवानाकडूनच समाज माध्यमाचा वापर एका आदिवासी तरुणीवर अत्याचार करण्यासाठीचा प्रकार समोर आल्याने अकोले तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 114755

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *