विजयादशमीच्या दिवशीच संगमनेरात चोरट्यांकडून सोन्याची लूट! आम्ही सणाला तरी सोने घालावे की नाही? संतप्त महिलांचा सवाल


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध पौराणिक घटनांचा संदर्भ घेऊन उगवलेला विजयादशमीचा दिवस चोरट्यांच्या लुटीने स्मरणीय ठरला आहे. आज सकाळी सणाच्या निमित्ताने सजूनधजून बाहेर पडलेल्या एका गृहिणीच्या गळ्यातील तब्बल दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी ओरबाडून नेले. या घटनेनंतर पोलिसांनी चारही बाजूला नाकाबंदी करून सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्यात त्यांना अपयश आले. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने शहरात सोनसाखळी चोरटे पुन्हा आपले पाय पसरू लागल्याचे चित्र निर्माण झाले असून महिलांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अकोले बायपास रस्त्यावरील गोल्डन सिटीच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. या परिसरात राहणारी एक गृहिणी आज काही चीजवस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली. गोल्डन सिटी वसाहतीचा फलक असलेली कमान ओलांडून त्या मुख्य रस्त्यावर येताच पाठीमागून आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्याला हिसका देत गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र ओरबाडून नेले. घटनेनंतर या महिलेने आरडाओरड केल्याने आसपासचे नागरिक धावले. मात्र तोपर्यंत चोरटे धूमस्टाईल प्रसार झाले होते.

या घटनेची माहिती गोल्डन सिटीच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या किराणा व्यावसायिकाने शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी बिनतारी संदेश यंत्रणेवरून शहरातील गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्‍यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन घडलेल्या घटनेचा घटनाक्रम जाणून घेतला. तोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या आदेशावरून शहरातून बाहेर जाणार्‍या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. मात्र पोलिसांची ही कारवाई होण्यापूर्वीच चोरटे आपला कार्यभाग उरकून सही सलामत पसार होण्यात यशस्वी झाले.

मात्र स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्‍यांनी अद्यापही जिद्द सोडलेली नाही. ऐन सणाच्या दिवशी महिलांच्या मनात भिती निर्माण करणार्‍या या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून दोन स्वतंत्र पथके चोरट्यांचा शोध घेण्याच्या मोहिमेवर आहेत. एका पथकाकडून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमधून त्यांचा माग शोधला जात आहे, तर दुसरे पथक ग्राऊंडवर काम करीत असून प्रत्यक्षदर्शींच्या वर्णनानुसार पूर्व इतिहास असलेल्या चोरट्यांचा सध्याचा ठावठिकाणाही पडताळला जात आहे.

एकीकडे पोलिसांचा एक भाग या गुन्ह्याची उकल करण्यात गुंतलेला असताना, दुसरीकडे ज्यांच्याकडे ठाण्याचा ‘अंमल’ आहे अशा सहाय्यक फौजदाराला मात्र या घटनेबाबत कोणतंही गांभीर्य असल्याचं दिसलं नाही. अंमलदारांकडे या घटनेबाबत चौकशी केली असता त्यांनी असं काही घडल्याची माहितीच नसल्याचे आश्चर्यकारक उत्तर दिले. ऐन विजयादशमीच्या दिवशी सकाळीच घडलेल्या या घटनेने महिलांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. आम्ही सणाला तरी दागिने घालावेत की नाही? असा सवालही महिलांमधून विचारला जात आहे.


गेल्या काही वर्षांमध्ये संगमनेर शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सातत्य राहिल्याने महिलांच्या मनात नेहमीच सोनसाखळी चोरांविषयी दहशत दाटलेली असते. त्यामुळे एरवी हौस असूनही महिला दागिने घालण्याचे टाळतात. मात्र आता चोरट्यांनी सणांच्या निमित्ताने महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने महिलांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी महिलांच्या भावनांचा आदर करून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घडणार्‍या आणि मध्यंतरी काही काळ थांबून आता विजयादशमीपासून पुन्हा सुरू झालेल्या या प्रकारांचा सखोल शोध घेऊन त्या कायमस्वरूपी बंद कराव्यात अशी मागणी महिलांमधून होत आहे.

Visits: 166 Today: 2 Total: 1107097

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *