मुंबईच्या संघांनी पटकाविले राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे अजिंयपद! संगमनेर फेस्टिव्हल; प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक वैभव घुगे यांची उपस्थिती


नायक वृत्तसेवा, संगमनेर
क्षणाक्षणाला पडणार्‍या टाळ्या.. त्याला मिळणारी शिट्ट्यांची साथ.. उपस्थितांतून होणारा जल्लोष आणि गणपती बाप्पांचा जयजयकार आणि सोबतीला मुसळधार पाऊस अशा जल्लोषपूर्ण वातावरणात संगमनेर फेस्टिव्हलचा तिसरा दिवस गाजला. मुंबईच्या आरडी वॉरिअर्स नृत्य संघाने सादर केलेल्या महाभारतावर आधारित हिपहॉप नृत्याने मालपाणी लॉन्सचा परिसर अक्षरशः भारावून गेला. हे नृत्य इतके बहारदार होते की त्याच्या सादरीकरणातच या संघाने पहिले पारितोषिक पटकाविल्याचे आडाखे बांधले गेले. कनिष्ठ गटातही मुंबईच्याच इंडियन आर्मी नृत्य संघाने सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर अप्रतिम नृत्य सादर करीत उपस्थितांना देशभक्तीत चिंब केले.

राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या आजच्या तिसर्‍या दिवशी राज्याच्या विविध भागातील नृत्य संघांचा समावेश असलेली राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संगमनेरातील विविध संघांसह राज्यभरातील जवळपास चाळीस संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

स्पर्धेच्या वरिष्ठ गटात मुंबईच्या आरडी वॉरिअर्स नृत्य संघाने रंगमंचावर नृत्यातून सादर केलेल्या महाभारतातील कुरुक्षेत्रावरील प्रसंगाने अक्षरशः रोमांच निर्माण केला. उत्कृष्ट वेशभूषा, साजेशी रंगछटा, परस्परांशी समन्वय, जलद आणि अचूक हालचाली, उत्कृष्ट पदलालित्य अशा सर्व क्षेत्रात बाजी मारीत या संघाने सादरीकरणातच या स्पर्धेचे अजिंयपद पटकाविले. २१ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. मुंबईच्याच रेज रि-यूनायटेड संघाला १५ हजार रुपयांचे पहिले, नारायणगावच्या द रि-यूनियन क्रू समूहाला ११ हजार रुपयांचे दुसरे, संगमनेरच्या संस्कार बालभवनने सादर केलेल्या शास्त्रीय नृत्यासह श्रीरामपूरच्या नक्षत्र नृत्य समूहाच्या गणेशवंदनेला विभागून तिसरे पारितोषिक देण्यात आले. पुण्याच्यागोल्डन स्टार्स, नाशिकच्या द टॅरेंटस् आणि संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या संघांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

कनिष्ठ गटात सादर झालेल्या विविध नृत्य प्रकारांनी उपस्थितांना खिळवून ठेवले होते. या गटात मुंबईच्या इंडियन आर्मी नृत्य संघाने उरी चित्रपटावर आधारित प्रसंगांना नृत्याचा साज चढवून देशभक्ती जागवली. त्याच्या अफलातून अविष्काराने या नृत्य स्पर्धेतील कनिष्ठ गटाचे अजिंयपद मिळवले. परभणीच्या आयुष नृत्य समूहाने काठी न् घोंगडं.. या रिमिस गीतावर सुंदर लोकनृत्य सादर करताना ११ हजारांच्या रोख रकमेसह पहिला क्रमांक पटकाविला. अकोले येथील पीव्हीआर संघाने खंडोबाचा गोंधळ घालीत सात हजारांचे दुसरे, शास्त्रीय नृत्य सादर करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलसह नवी मुंबईच्या जेएचके २१ क्रू समूहाला विभागून तिसरा क्रमांक देण्यात आला. जीएनडी क्रू, नृत्य डान्स अकादमी (पारनेर) व संगमनेरच्या बीटऊस नृत्य संघाला उत्तेजनार्थ बक्षिसे देवून गौरविण्यात आले.

रचना मालपाणी, मिलिंद पलोड व केवल गुजराथी यांनी परीक्षकाची भूमिका बजावली. आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले नृत्य दिग्दर्शक वैभव घुगे, संगमनेर फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, राजस्थान मंडळाचे कार्याध्यक्ष सम्राट भंडारी, उपाध्यक्ष सुदर्शन नावंदर, सचिव ओम इंदाणी, खजिनदार व्यंकटेश लाहोटी आदिंच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली. सचिन पलोड व प्रशांत करपे यांनी आजच्या कार्यक्रमाचे बहारदार निवेदन करीत संगमनेरकरांची मने जिंकली.


मुलांना पराभव शिकवा..
या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज नृत्य दिग्दर्शक वैभव घुगे यांनी यावेळी बोलताना कोटा (राजस्थान) येथील विद्यार्थ्यांच्या एकामागून एक आत्महत्येच्या घटनांचा उल्लेख करीत पालकांशी संवाद साधला. आपल्या मुलांमधील कलागुण ओळखा व त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात रमू द्या, इतर मुलांशी त्यांची तुलना करु नका, आपल्या मुलांना जिंकायला नव्हे तर हरायला शिकवा म्हणजे त्यांच्यावर दबावही येणार नाही आणि त्यांना जिंकण्याचे महत्त्वही सहज समजेल असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. केवळ डॉटर, इंजिनिअर होणं म्हणजेच प्रगती ठरु शकत नाही, कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग काम घडले की पैसा आणि प्रतिष्ठा आपोआप येते. मुलांना त्यांचे जीवन जगू द्या असे आवाहनही त्यांनी केले.

Visits: 50 Today: 1 Total: 428021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *