वन्यजीव सप्ताहनिमित्त भटक्यांच्या पंढरीत भटक्यांचे संमेलन पर्यटनामध्ये निसर्गाचा समतोल राखण्यावर सर्वांनी दिला भर

नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजीव सप्ताहनिमित्त भटक्यांच्या पंढरीत भटक्यांचे संमेलन घाटघर इको-सिटी येथे आयोजित करण्यात आले. सदर संमेलनाचे उद्घाटन मुंबई येथील प्रसिद्ध गिर्यारोहक राजेश गाडगीळ, नाशिक येथील गिर्यारोहक संजय अमृतकर, डॉ. नितीन बस्ते, पुण्याचे ओंकार ओक, संगमनेरचे श्रीकांत कासार, रमाकांत डेरे व सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात गिर्यारोहण करणारे तज्ज्ञ तसेच स्थानिक आदिवासी युवक व गाईड आणि वनविभाग या तीनही घटकांनी एकत्र येवून शाश्वत पर्यटन करणे व पर्यटकांना सोई-सुविधा देणे यावर चर्चा झाली. राजेश गाडगीळ यांनी स्थानिक युवकांना आपली गुणवत्ता वाढवून पर्यटकांना चांगली सुव्यवस्था देण्याबाबत सांगितले. तसेच डॉ. बस्ते यांनी सदर क्षेत्रात रॅपलिंग अकॅडेमी, योगा सेंटर व विविध विषयांचे फोटोग्राफी इव्हेंट चालू करण्यासाठी सूचना केली. यासाठी सदरचा भंडारदरा परिसर योग्य असून सदर कामे झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल असे सांगितले. श्रीकांत कासट यांनी गडकिल्ल्यांचे जतन करणे आवश्यक असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखावे अशी सूचना केली. तर डॉ. हेमंत बोरसे यांनी वनविभाग व ग्रामस्थ एकत्र आल्यास फार मोठा बदल घडवू शकतात असे सांगून पर्यटन वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे असे सांगून
स्थानिक ग्रामस्थ व पर्यटनाचा व्यवसाय करणारे तरुणांनी पर्यटन वाढीसाठी वन विभागास सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

संजय अमृतकर यांनी शिक्षित गाईड असायलाचं हवेत. त्यासाठी प्रशिक्षण शिबिरे व साहसी शिक्षण घेऊन त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत असे नमूद केले. अभयारण्यात पर्यटन वाढीसोबत वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन तसेच निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे असले पाहिजे. त्यासाठी स्थानिक व पर्यटक यांचा समन्वय साधण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे, असे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले. या कार्यक्रमात आदिवासी नृत्य सादर करुन आदिवासी संस्कृतीची ओळख सगळ्यांना करुन दिली. सूत्रसंचालन दत्तात्रय पडवळे यांनी केले तर आभार अमोल आडे यांनी मानले. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी वनपाल बी. एस. मुठे, वनरक्षक एम. सोनार, एम. जी. पाटील, जी. ए. दिवे, सी. बी. तळपाडे, ए. आर. शिंदे, एम. ए. सरोदे यांनी सहकार्य केले.
