अमृतवाहिनी बँकेचे माजी चेअरमन अमित पंडित यांना अटक! नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण; वरच्या मजल्यावर दडून बसले होते..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधीकाळी सर्वसामान्यांची बँक म्हणून लौकीक असलेल्या नगर अर्बन बँक घोटाळ्याचे ओघळ आता थेट संगमनेरपर्यंत पोहोचले आहेत. सुमारे अडिचशे कोटी रुपयांच्या या महाघोटाळ्याच्या तपासात बनावट कागदपत्रांसह मिळकतीचे दाखले व दस्त सादर करुन संस्थेची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संचालकांसह अशा प्रकरणांना जबाबदार असलेल्या कर्जदारांनाही कायद्याच्या कक्षेत घेण्यास सुरुवात झाली असून संगमनेरचे प्रख्यात उद्योजक, अमृतवाहिनी बँकेचे माजी चेअरमन अमित पंडित यांना संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली आहे. या वृत्ताने उद्योग क्षेत्रासह सहकार क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. पंडित माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईच्या ‘टायमिंग’वरही प्रश्न निर्माण झाले आहेत.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी अमृतवाहिनी बँकेचे माजी चेअरमन अमित पंडित यांना अटक करण्याचे आदेश दिले. मात्र तत्पूर्वीच पंडित यांना अटकेची कुणकून लागल्याने ते मोबाईल बंद करुन भूमिगत झाले. त्यामुळे पोलिसांना त्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडावे लागले. आज शहरातील एका मोठ्या व्यापार्याच्या कन्येचा विवाह सोहळा आहे. तेथे त्यांची हमखास उपस्थिती गृहीत धरुन साध्या वेशातील पोलिसांनी मंगल कार्यालय पालथेही घातले, मात्र काहीच मिळाले नाही.

पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास अमित पंडित यांच्या घरावर छापा घातला. यावेळी घर झडतीतही त्यांचा शोध लागला नाही. मात्र ते घरातच असल्याचा दाट संशय असल्याने पोलिसांनी प्रत्येक खोलीची आणि घराच्या कानाकोपर्याची सखोल तपासणी केली
असता पंडित त्यांच्याच शयनकक्षात नाट्यमय पद्धतीने लपून बसल्याचे आढळले. त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्या घरासह त्यांच्या पेट्रोल पंपाचीही झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह उपनिरीक्षक रमेश पाटील, सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस काँन्स्टेबल विशाल करपे व हरिश्चंद्र बांडे यांचा सहभाग होता. या कारवाईने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

एकेकाळी सर्वसामान्यांची बँक असा लौकीक असलेल्या नगर अर्बन बँकेत खोटी कागदपत्रे, दस्तावेज, मालमत्ता आणि बनावट सोने तारण ठेवून 261 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाला आहे. त्यामुळे 110 वर्षांची परंपरा असलेली ही बँक कोसळली. सर्वसामान्य ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या ठेवी परत मिळाव्या यासाठी आंदोलने झाली. आता त्या प्रकरणाच्या तपासाला गती आली असून नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने संचालकांपाठोपाठ अशा प्रकारचे बनावट प्रस्ताव सादर करुन मोठे कर्ज घेणार्या उद्योजक आणि व्यापार्यांनाही कायद्याच्या चौकटीत घ्यायला सुरुवात केली आहे.

