कोरोनाची लस येईपर्यंत सर्वांनी काळजी घेणे गरजेचे ः निकम

कोरोनाची लस येईपर्यंत सर्वांनी काळजी घेणे गरजेचे ः निकम
श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान
नायक वृत्तसेवा, घारगाव
जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत सर्वांनी स्वतःची, कुटुंबाची व आजूबाजूला असलेल्या सर्वांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे काँग्रेस गटनेते अजय फटांगरे, रमेश आहेर, संस्थेचे अध्यक्ष डॉ.शिवाजी पोखरकर, बोटा गावचे सरपंच विकास शेळके, पोलीस पाटील संजय जठार, सावरगाव तळचे पोलीस पाटील गोरक्षनाथ नेहे, शिवाजी शेळके, बाळासाहेब कुर्‍हाडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना तहसीलदार निकम म्हणाले, कोरोनाच्या काळात आत्तापर्यंत आपण सर्वांनी खूप चांगले काम केले असून यापुढेही अजून काम आपल्या सर्वांना करायचे आहे. आपल्या संगमनेरची बाजारपेठ खूप मोठी असल्याने गर्दी होणे साहजिक आहे. मात्र असे असताना देखील ज्या-त्या गावचे सरपंच, पोलीस पाटील, महसूल व आरोग्य आदी कर्मचार्‍यांनी कोरोनाच्या काळात अतिशय चांगले काम केल्यामुळे आपल्याला मृत्यूंची संख्या आटोक्यात आणता आली आहे. परंतु, आता असे असले तरी आपल्या सर्वांना काळजी घ्यायची आहे. त्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर सतत वापरावे. शेवटी कडक टाळेबंदीमध्ये उत्तमरित्या जबाबदारी निभावलेल्या कर्मचारी व पदाधिकार्‍यांचे त्यांनी कौतुक करत आभार मानले.

जिल्हा परिषदेचे काँग्रेस गटनेते अजय फटांगरे म्हणाले, कोरोनाच्या काळात तालुक्यात सर्वांनी चांगले काम केले आहे. यामध्ये सर्वच संस्था असून सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आदिंनी काम केले आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करायचा असेल तर आपण सर्वांनी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. याप्रसंगी संस्थेच्यावतीने डॉक्टर्स, आरोग्य सेवक, पोलीस पाटील, पत्रकार आदिंचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 

Visits: 10 Today: 1 Total: 116360

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *