अकोल्यातील भाजप पदाधिकार्‍याची माध्यमांवर आगपाखड! स्थानिक माध्यमं ‘बावळट’ असल्याचा उल्लेख; माध्यमांच्या रोषानंतर जाहीर माफीनाट्य..

नायक वृत्तसेवा, अकोले
लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदार संघात झालेला पराभव महायुतीच्या नेत्यांना चांगलाच जिव्हारी लागल्याचे चित्र सध्या अहमदनगर जिल्ह्यात बघायला मिळत आहे. सोमवारी शिवसेनेचे पराभूत उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या राम मंदिरावरील वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यभरात राळ उठलेली असताना आता त्यात भाजपच्या जिल्हा पदाधिकार्‍यानेही तेल ओतण्याचे काम केले आहे. एका यु-ट्यूब वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तालुक्यातील मीडिया चक्क ‘बावळट’ असल्याचे व सदरचे वक्तव्य आपण जबाबदारीने करीत असल्याचे सांगत नव्या वादाला तोंड फोडले. या बेताल वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली असून त्यांनी आपल्याच वक्तव्याची सारसारव करीत जाहीर माफीही मागितली आहे. मात्र महायुतीमधील काही बोलघेवड्यांकडून सुरु झालेला शब्दांचा हा खेळ आता राज्यभर चर्चेत येवू लागला असून निवडणुकीतील पराभव त्यांच्या पचनी पडत नसल्याचेही दिसून येत आहे.


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवामागे त्यांची निष्क्रियता कारणीभूत असताना सोमवारी त्यांनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य करीत थेट राम मंदिरावरच प्रश्‍नचिन्ह उभे केले. शिर्डी मतदार संघात आदिवासी समाजाची संख्या अधिक असून आजही रावणाची पूजा होते. अयोध्येतील राम मंदिर त्यांना रुचले नाही असे सांगत त्यांनी वादाला फोडणी दिली. त्यावरुन संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर टीका होवू लागल्याने सायंकाळ होताहोता त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बेताल वक्तव्यावरुन उठलेली राळ शांत होत असतानाच आता उत्तर नगरजिल्ह्याचे भाजप सरचिटणीस सीताराम भांगरे यांनीही वादग्रस्त वक्तव्याच्या आगीत तेल ओतले आहे.


एका स्थानिक यु-ट्यूब वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी निवडणूक निकालांचा संदर्भ देताना; ‘काही ठिकाणचे पत्रकार निवडणुकीतील पराभवामागील कारणांबाबत विचारणा करीत होते, मात्र येथील ‘बावळट’ मीडिया, बावळट हा शब्द मी जबाबदारीने वापरतोय, कारण माझे 50 वर्षांचे आयुष्य तालुक्याच्या राजकारणात गेले आहेत, त्या मीडियाने ‘ती’ बातमी काऊंटर करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार वैभव पिचड कोणाच्या दारी? अशा वावड्या उठवताना चुकीचा ‘नेरेटीव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न केला. कोणी काहीही टाकयला लागलं, मात्र यातून मूळ गोष्टीवर झाकणं टाकण्याचे काम स्थानिक मीडियाने केल्याचा गंभीर आरोपही करताना होय, मी सांगतोय तुम्ही काऊंटर करण्यासाठीच तुम्ही फेक मीडिया म्हणून ‘ती’ बातमी चालवली अशी आगपाखडही त्यांनी केली.


एकीकडे स्थानिक मीडियावर तोंडसुख घेत असताना मंचावर उपस्थित माजी आमदार वैभव पिचड यांच्यावर स्तुतिसुमनं उधळण्यासाठी त्यांनी तालुक्यातील विकासकामांनाही हात घालताना आमदार डॉ.किरण लहामटे यांच्यावर परस्पर तीर डागला. तालुक्यातील खडीकरण, डांबरीकरण व रस्ते मजबुतीकरणाची कामं भारतीय जनता पार्टीकडून सुरु असून पिचड यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून तालुक्यात सातशे ते नऊशे कोटी रुपयांची कामे झाल्याचा दावा त्यांनी केला. विद्यमान आमदार डॉ.लहामटे यांनी फक्त रेघा ओढण्याचे काम केल्याची टीका करीत त्यांनी अकोल्याच्या महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचेही दाखवून दिले.


पिचड साहेबांनी शहराला बसस्थानक दिले तर, वैभव पिचड यांनी सातत्याने पाठपुरावा करीत बसस्थानकाच्या सुशोभिकरणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन 11 कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दाखलाही त्यांनी दिला. तालुक्यात झालेली अथवा सुरु असलेली विकासकामे महायुती सरकारकडून होत असल्याचे सांगत कोणी आपलीच शेखी मिरवत असेल तर तो केवळ रेघा ओढण्याचा प्रकार असल्याचा घणाघातही त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर अकोले तालुक्यातील पत्रकार संतप्त झाल्याने काही तासांतच त्यांना आपल्या वक्तव्याची उपरती झाली आणि घाईघाईत त्यांनी पुन्हा स्थानिक माध्यमांसमोर येत तालुक्यातील पत्रकारांची जाहीर माफी मागत असल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत.


मी एका स्थानिक यु-ट्यूब वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मीडियाबाबत केलेला उल्लेख काही ठराविक वृत्तींसाठीच होता. त्यातून सगळ्याच पत्रकारांना बोलण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र तरीही माझ्या बोलण्यातून तालुक्यातील ज्येष्ठ, श्रेष्ठ व इतर पत्रकार दुखावले गेले असतील तर मी त्या सर्वांची जाहीरपणे माफी मागतो.
सीताराम भांगरे
भाजप सरचिटणीस, उत्तर नगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *