सफाई कर्मचार्‍यांचे काम बंद; श्रीरामपूर शहर बनले ‘कचरामय’

सफाई कर्मचार्‍यांचे काम बंद; श्रीरामपूर शहर बनले ‘कचरामय’
कोरोना संकटातही पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर पालिकेत कंत्राटी तत्वावर काम करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांचे वेतन थकल्याने काम बंद केले आहे. यामुळे ऐन सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून नेवासा, संगमनेर, गोंधवणी, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि मोकळ्या जागांवर कचर्‍याचे ढीग लागले आहेत. आधीच कोरोना संकटाने नागरिक भयभीत असताना स्वच्छतेची समस्या निर्माण झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, कचरा उचलण्यासाठी शहरातील अनेक भागांत नियमितपणे घंटागाडी येत नसल्याने नागरिक बेजबाबदारपणे उघड्यावर कचरा टाकतात. विविध रस्त्यांवर, मोकळ्या जागांत, विविध मैदानांसह चक्क रस्तादुभाजकांवर सर्रास कचरा टाकण्याची वाईट सवय नागरिकांना लागली आहे. त्यामुळे शहर कचरामय झाल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. उघड्यावर पडलेला कचरा खाण्यासाठी मोकाट कुत्री आणि मोकाट जनावरे रस्त्यावर फिरतात. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते. त्यात आणखी भर म्हणून शहरासह तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

सफाई कर्मचार्‍यांनी काम बंद केल्याने नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी विविध भागांतील नागरिक करीत आहेत. त्यामुळे गुरुवारी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी संबंधित ठेकेदाराला अनामत रक्कम देऊन स्वच्छता सुरू करावी, तसेच टप्प्याटप्याने देयके अदा केली जाणार असल्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यानंतरही शहरात सर्वत्र कचरा साचल्याचे दिसून येते.

शहराच्या अनेक भागांतील नागरिक उघड्यावर कचरा टाकतात. उघड्यावर फेकलेला कचरा आरोग्य धोक्यात आणत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत नियमित साफसफाई होत नाही. एकीकडे कोरोनाच्या संकटात सर्वत्र स्वच्छतेचे महत्त्व पटले, तर दुसरीकडे शहरात सर्वत्र कचरामय वातावरण पाहायला मिळते. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटात विविध ठिकाणी बाजार भरण्याची संकल्पना पुढे आली. तर उघड्यावर कचरा फेकणार्‍यांवर पालिकेकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने, शहरातील सर्वच रस्तादुभाजके कचराकुंड्या बनली आहेत.

 

Visits: 95 Today: 1 Total: 1101005

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *