शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा झालेला मृत्यू दुर्दैवी ः आ. डॉ. लहामटे शिंदे कुटुंबाला सरकारची मदत मिळवून देण्याचे आश्वासन

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील मोधळवाडी येथे शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे सरकारची जी काही मदत आहे ती मदत शिंदे कुटुंबाला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली.

पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडी येथे धुणे धुण्यासाठी जयश्री बबन शिंदे (वय 21) व आयुष बबन शिंदे (वय 7) या बहीण-भावाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मंगळवारी (ता.10) सायंकाळी या शिंदे कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत माजी पंचायत समिती सदस्य किरण मिंढे, सरपंच अलका मिंढे, सावरगाव घुलेचे उपसरपंच नामदेव घुले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार लहामटे म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, गोपीनाथ मुंढे अपघाती विमा योजना ही सर्व मदत मिळवून देवू. परंतु माझी शेतकर्यांना विनंती आहे की ज्यांची शेततळे आहे त्या शेतमळ्याला संरक्षक जाळी किंवा भिंत बांधावी, तळ्यात दोर, ड्रम, ट्युबा सोडाव्यात. यदाकदाचित असा प्रसंग आला तर जीव वाचविण्यासाठी त्याचा उपयोग होईल. शेतकर्यांसह पालकांनी देखील आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे, सध्या उन्हाळा सुरू असून, पाण्याच्या स्त्रोतांमध्ये अंघोळीसाठी जाणार्या मुलांकडेही विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
