मालकाची उचल बुडविण्यासाठी पोटच्या गोळ्याचा केला खून! श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल; धक्कादायक घटनेने शहर हादरले
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
मालकाकडून घेतलेली अडीच लाख रुपयांची उचल बुडविण्यासाठी एका पित्याने आपल्या दहा महिन्याच्या चिमुरड्याचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. येथील एमआयडीसीमधील खंडाळा शिवारात प्लॅट नंबर बी. चार / दोनच्या उत्तरेकडील मोकळ्या जागेत गुरुवारी (ता.2) पहाटे चार वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला तत्काळ अटक केली आहे.
याप्रकरणी मयत चिमुरड्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन श्रावण बाळनाथ अहिरे (वय. 40, रा. हिरेनगर, ता. नांदगाव, जि. नाशिक) हल्ली राहणार येथील एमआयडीसीमधील खंडाळा शिवार याच्याविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा येथील शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी आपल्या चार मुलासह पती समवेत बुधवारी (ता.1) रात्रीच्या सुमारास झोपलेले होते. त्यावेळी पती श्रावण अहिरे याने आमचे मालक संतोष गोराणे यांच्याकडून उचल म्हणून घेतलेले अडीच लाख रुपये बुडविण्यासाठी माझा मुलगा सोपान अहिरे याचा गळा दाबून ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेवून पहाणी केली. त्यानंतर शहर पोलीस पथकासमवेत श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथक व फॉरेन्सिक लॅबच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी व आरोपीची चौकशी करुन शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.