सलग सुट्ट्यांमुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांची मांदियाळी गर्दी झाल्याने धरण भिंतीजवळ निर्माण झाली होती वाहतूक कोंडी
नायक वृत्तसेवा, अकोले
स्वातंत्र्य दिन व पारशी नववर्षानिमित्तची सुट्टी जोडून आल्यामुळे निसर्ग सौंदर्याची खाण असलेल्या भंडारदरा धरण (ता.अकोले) परिसरात हजारो पर्यटकांनी हजेरी लावली. यामुळे रस्ते गर्दीने ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळाले.
दरवर्षी स्वातंत्र्य दिनी भंडारदरा परिसरात पर्यटकांची मांदियाळी येत असते. यंदा देखील जोडून सुट्ट्या आल्याने धरण भिंतीजवळ गर्दी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर राजूर पोलिसांनी एकेरी वाहतूक नियमन केल्याने पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक पर्यटनस्थळी अशीचं परिस्थिती आहे. दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात उंच असणार्या कळसूबाई शिखरावरही पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई आणि अहमउनगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दरवर्षी येत असतात. भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी, सांदनदरी या प्रेक्षणीय स्थळी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाली. तर अधूनमधून कोसळणार्या पावसाच्या हलक्या सरी अंगावर घेत ओलेचिंब होण्याचा आनंदही पर्यटकांनी लुटला. याचबरोबर निसर्गाचे हे अद्भूत रुप अनेकजण आपल्या मोबाइलच्या कॅमेर्यात कैद करत होते. दरवर्षी स्वातंत्र्य दिनी भंडारदरा धरण भरण्याची परंपरा आहे. यंदा मात्र पावसाने हूल दिल्याने ही परंपरा खंडीत झाली. परंतु, याचा पर्यटकांच्या आनंदावर कुठलाही परिणाम झाला नाही. अरुंद आणि खराब रस्त्यांमुळे मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. यामुळे पोलिसांनाही वाहतुकीचे नियमन करताना कसरत करावी लागली.