विचित्र अपघातात संगमनेर तालुक्यातील तिघांसह सहा ठार! ढवळपुरीनजीकची भीषण घटना; संगमनेर तालुक्यावर पुन्हा शोककळा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऊस वाहतूक करणारी ट्रॉली रस्त्यात पलटल्याने त्याला मदत करण्यासाठी त्या पुढ्यात चाललेली ट्रॉली थांबली. दोन्ही चालक व काही मजूर त्याच्या मदतीला थांबले आणि विखूरलेला ऊस गोळा करु लागले. नगर-कल्याण महामार्गावर पहाटे अडीचच्या सुमारास हा प्रकार सुरु असताना एक इको वाहन येवून थांबले. अपघातग्रस्तांना मदत म्हणून आपल्या वाहनाचे पार्किंग लाईट सुरु ठेवून चालकाने वाहतुकीचे संचलन करण्यास सुरुवात केली. काही वेळातच ठाण्याहून मेहेकरला जाणारी महामंडळाची रातराणी आली. मात्र चालकाला रस्त्यावर उभी असलेली ट्रॅक्टर-ट्रॉलीच न दिसल्याने त्याने ट्रॉलीला धडक दिली, ट्रॉलीची धडक मदतीला थांबलेल्या इकोला बसली. या भयंकर घटनेत मदतीला थांबलेल्या मजुरांसह पाच जणांचा जागीच तर एकाचा नगरच्या रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्दच्या तिघांसह पारनेरमधील दोघे आणि पाथर्डी तालुक्यातील एकाचा समावेश आहे. या घटनेने धांदरफळ घटनेतून सावरत असलेल्या संगमनेर तालुक्यावर पुन्हा शोककळा पसरली आहे.

सदरचा भीषण अपघात आज (ता.२४) पहाटे पावणे तीनच्या सुमारास पारनेर तालुक्यातील ढवळपुरी फाट्यानजीक घडला. ऊस वाहतूक करणारी एक ट्रॉली नगर-कल्याण रस्त्यावरील हिवरे कोरडा शिवारात पलटली. त्यामुळे त्यातील सगळा ऊस रस्त्यावर विखूरला. त्यावरुन वाहने जावू लागल्याने नुकसान होवू लागले. ते पाहून सोबत जाणार्‍या दुसर्‍या ट्रॉली वाहकाने थांबून काही मजुरांच्या मदतीने रस्त्यावरील ऊस गोळा करण्यास सुरुवात केली. या दरम्यान वाहतूक सुरुच असल्याने अडथळे येण्यासह अपघात घडण्याचीही सतत शक्यता होती.

हा प्रकार पाहून रस्त्याने जाणार्‍या एका इको वाहनचालकातील माणूस जागला. त्याने आपले वाहन पलटलेल्या ट्रॉली पुढे उभे करुन पार्किंग लाईट सुरु ठेवली व स्वतः वाहतुकीचे संचालनही सुरु केले. त्यामुळे रात्रीच्या अंधारात एका बाजूने अपघाताची शक्यता कमी झाली. मात्र त्याचवेळी ठाण्याहून नगरकडे येणार्‍या महामंडळाच्या ठाणे-मेहेकर बसचालकाला रस्त्यात उभी ट्रॉली न दिसल्याने त्याने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे सदरची ट्रॉली त्या पुढ्यात असलेल्या अपघातग्रस्त ट्रॉलीसह मदतीला थांबलेल्या इकोवर जावून आदळली. या विचित्र घटनेत रस्त्यावरील ऊस गोळा करण्यासाठी मदत करणार्‍या मजुरांसह आठजण गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर आसपासच्या १० ते १५ तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करीत जखमींना पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र दुर्दैवाने त्यातील पाच जणांचा जागीच तर एकाचा अहमदनगर रुग्णालयात मृत्यू झाला. बचावकार्य करीत असताना वाहनात अडकलेल्या जखमीला बाहेर काढताना सुयोग अडसूळ हा तरुण पत्रा लागल्याने गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातात संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्दचे जयंत रामभाऊ पारधी, संतोष लक्ष्मण पारधी व अशोक चिमा केदार या तिघांसह पारनेर तालुक्यातील देसवडेच्या नीलेश रावसाहेब भोर, वारगवळीच्या प्रकाश रावसाहेब थोरात यांच्यासह पाथर्डी तालुक्यातील मानूर टाकळीच्या सचिन कांतीलाल मंडलेचा या सहा जणांचा मयतांमध्ये समावेश आहे. देवेंद्र गणपत वाडेकर आणि बद्रीनाथ विठ्ठल जगताप या दोघा जखमींवर उपचार सुरु आहेत. पारनेरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तत्काळ फौजफाट्यासह पोहोचून मदतकार्य केले व अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.


नववर्षाच्या सुरुवातीलाच धांदरफळ खुर्द येथे घडलेल्या दुर्घटनेत दोघांचा जागीच तर एकाचा गेल्या आठवड्यात हकनाक बळी गेला. ती घटना संपूर्ण तालुक्याला वेदना देणारी होती. त्यातून संगमनेर तालुका सावरत असतानाच आज पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत मजुरीसाठी आसपासच्या साखर कारखान्यांवर राबणार्‍या मजुरांवर काळाने घाला घातला आणि या भीषण घटनेत जांबूत खुर्दच्या तिघांसह सहा जणांचा बळी गेला. या घटनेने तालुक्यावर पुन्हा शोककळा पसरली आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 27309

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *