माळीचिंचोरा फाटा येथे ग्रामस्थांचा रास्ता रोको कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील माळीचिंचोरा फाटा येथे गुरुवारी (ता.29) नगर-औरंगाबाद महामार्गावर कारने दिलेल्या धडकेत संकेत लक्ष्मण पुंड (वय 19) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या माळीचिंचोरा ग्रामस्थांनी येथे अचानक रास्ता रोको आंदोलन केले.

मयत संदीप हा गुरुवारी दुपारी आपल्या आत्याला सोडविण्यासाठी माळीचिंचोरा फाटा येथे आलेला होता. आत्याला सोडवून जात असताना औरंगाबादहून-नगरकडे जाणार्‍या भरधाव वेगातील अलिशान कारने दुचाकीवर असलेल्या संकेत पुंड याला जोराची धडक दिल्याने तो अपघातात जागीच ठार झाला. या अपघातास चिंचोरा फाट्यावर असलेले अनधिकृत पत्र्याचे शेड कारणीभूत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या शेडमुळे रस्त्याने आलेले वाहन दिसत नाही. यामुळेच अपघात होत आहेत. त्यामुळे हे शेड तत्काळ काढण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी करत रास्ता रोको केला.

या रोकोमुळे नगर-औरंगाबाद महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रास्ता रोकोची माहिती मिळताच नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शेड काढण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम राहिल्याने पोलीस निरीक्षक करे यांनी तहसीलदार व बांधकाम विभागाचे अधिकारी यांना आंदोलनस्थळी पाचारण केले. दोन दिवसांत सदर शेड काढण्याचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

Visits: 188 Today: 2 Total: 1110726

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *