लग्नाचे आमिष दाखवून जिल्हा परिषद शिक्षकाचा राहुरीतील शिक्षिकेवर अत्याचार! नारळातून गोळ्या देवून बळजोरीने गर्भपातही केला; संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधःकार नाहीसा करुन ज्ञानाच्या वाटेकडे घेवून जाणारी वंदनीय व्यक्ती म्हणून आपल्या संस्कृतीत पूजनीय मानली गेली आहे. मात्र आजच्या युगातील काही विकृत शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मार्गावर नेण्याऐवजी स्वतःच भरकटल्याची अनेक उदाहरणे समोर येत असताना आता एका शिक्षकाने आपल्याच क्षेत्रातील राहुरीत राहणार्‍या शिक्षिकेच्या असाहय्यतेचा फायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवले व वेगवेगळ्या ठिकाणी नेवून वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याची व त्यातून गर्भधारणा झाल्यानंतर बळजोरीने नारळातून गोळ्या देवून गर्भपात केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातून समोर आली आहे. या प्रकरणी घुलेवाडीतील जिल्हा परिषदेचा शिक्षक योगेश अण्णासाहेब थोरात याच्यासह त्याच्या सहकार्‍यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा नराधम शिक्षक पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार मूळ राहुरी तालुक्यातील रहिवाशी असलेल्या या 41 वर्षीय शिक्षिकेची संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीत राहणार्‍या योगेश अण्णासाहेब थोरात या जिल्हा परिषदेच्या शिक्षकासोबत 2019 साली जुन्या पेंशन हक्क संघटनेच्या माध्यमातून ओळख झाली. या दरम्यान दोघेही राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीही करीत असल्याने दोघांचा एकमेकांशी फोनवरुन संपर्कही वाढला. त्यातून निर्माण झालेली मैत्री मर्यादा ओलांडण्यापर्यंत जाण्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने पीडित शिक्षिकेने योगेश थोरात याला वास्तवाचे दर्शन घडवतांना आपण घटस्फोटीत असल्याचे व आपणास वयात आलेला मुलगाही असल्याचे सांगितले, या शिवाय आपल्या दोघांच्या वयात पाच वर्षांचे अंतर असल्याचेही त्या शिक्षीकेने थोरात यांच्या निदर्शनास आणून दिले.

मात्र डोक्यात वासना शिरलेल्या योगेश थोरात याने ‘असल्या गोष्टींचा माझ्यावर काही फरक पडत नाही, माझे तुझ्यावर अतोनात प्रेम आहे. मी तुझ्यासोबत लग्न करुन तुला आयुष्यभर सांभाळेल’ अशी भावनिक साद घालीत त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले. त्यातून त्या दोघांमध्ये जवळीक वाढत गेल्याने कधी ती शिक्षिका संगमनेरात येवून त्याला भेटत, तर कधी थोरात राहुरीत जावून प्रेमाच्या आणाभाका घेत. या दरम्यान त्याने आपले वाहन दुरुस्ती व वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून त्या शिक्षीकेकडून साडेतीन लाखांची रक्कमही उकळली. त्यातील एक लाख रुपये त्याने तिला परतही केले. त्यानंतरच्या कालावधीत तो त्या शिक्षिकेला घेवून अनेक वेळा पुण्यात जावूनही रहायचा व प्रत्येकवेळी लग्न आणि आयुष्यभर सांभाळाचे आमिषही दाखवायचा.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तो अचानक ‘माझ्या घरातील मंडळी माझ्या लग्नासाठी तगादा करीत असल्याचे व माझी आई मी सांगेल त्याच मुलीशी लग्न करावे लागेल म्हणून सारखा आग्रह करीत आहे’ असे त्या शिक्षिकेला सांगू लागला. त्यावर पायाखालची जमीन सरकलेल्या शिक्षिकेने ‘तू मला फसवू शकत नाहीस?, प्रेम माझ्याशी अन् लग्न दुसरीशी हे कसे चालेल’ अशी विचारणा केली असता, ‘ठीक आहे! मी नाही करणार लग्न’ असे म्हणत त्याने चर्चा थांबवली. दोन महिन्यांनी जानेवारी 2022 मध्ये त्याने पुन्हा तोच विषय काढून आपल्या घरातील माणसं आता आपलं ऐकत नसल्याचं आणि लग्नासाठी एकसारखा तगादा सुरु असल्याचे सांगू लागला. ‘तू जर मला लग्न करु दिले नाहीस तर दोन-चार दिवसांत माझा मृतदेहच बघायला मिळेल’ असा भावनिक दमही त्याने त्या असाहाय्य शिक्षिकेला भरला.

त्यामुळे सदरची शिक्षिका त्याच्या भूलथापांना बळी पडली. मात्र त्यावरही त्याने ‘मी केवळ आईसाठी लग्न करतोय, मात्र माझं तुझ्यावरच प्रेम आहे. मी तुला कधीही अंतर देणार नाही’ असे म्हणतं चक्क त्याच्या अंगाला हळद लागलेली असतानाही तो संगमनेरहून राहुरीला तिला भेटण्यासाठी गेला. त्याचे लग्न झाल्यानंतरही तो त्या शिक्षिकेला भेटत व मला मुलगी पसंद पडलेली नाही, मी लवकरच तिच्यापासून फारकत घेईल. त्यानंतर आपण दोघंही नोंदणी पद्धतीने विवाह करु असे तो म्हणू लागला. मात्र त्या शिक्षिकेने लग्न झाल्याशिवाय आपल्यात कोणतेही संबंध प्रस्थापित होणार नसल्याचे त्याला ठणकावले व ती त्याच्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करु लागली. याच दरम्यान गेल्या 25 जून रोजी त्याने सदर शिक्षिकेला फोन करुन संगमनेरला बोलावले व रात्री आठच्या सुमारास आपल्या इनोव्हा कारने तिला सोडण्यासाठी राहुरीला जात असताना कोकणगावजवळ आडवाटेला वाहन थांबवून त्या नराधमाने वाहनातच बळजबरीने त्या शिक्षिकेवर बलात्कार केला.

यावेळी त्या अबलेनेे त्याचा प्रतिकारही केला, रडूनही पाहिले आणि पोलिसांमध्ये तक्रार देण्याची तंबीही भरुन पाहिली. मात्र वासनेच्या सागरात बुडालेल्या त्या शिक्षकाने त्याकडे दुर्लक्ष करीत आपली वासना शमवलीच. त्यातून त्या शिक्षिकेला गर्भधारणा झाल्याचे तिने त्याला सांगितल्यानंतर 28 जुलै रोजी बाभळेश्वर ते कोल्हार रस्त्यावर गाडी थांबवून त्याने तिला बळजबरीने दोन ग्लास नारळाचे पाणी पाजले व त्यानंतर तिला घरी नेवून सोडले. दुसर्‍या दिवशी तो पुन्हा राहुरीला गेला व तेथून दोघेही एका हॉटेलात जेवणासाठी गेले. रात्री दोघेही त्या शिक्षिकेच्या घरी गेल्यावर त्याने आपल्या गाडीतून एक पुडी काढून आणली व ती दह्यात मिसळून एक चमचा तिला खावू घातला व त्यानेही एक चमचा खाल्ला. त्यावर राहिलेले दही खाण्याचा तो आग्रह करु लागल्यावर मी रात्री खाईल असे ती शिक्षिका म्हणाल्यावर तो तेथून संगमनेरकडे रवाना झाला. त्यानंतर त्या शिक्षिकेने ते दही मात्र खाल्ले नाही.

मात्र या सर्व प्रकाराने रात्रीच्या सुमारास त्या शिक्षिकेच्या पोटात दुखू लागल्याने तिने त्याला फोन करुन लगेच येण्यास सांगितले. यावेळी त्याने ‘तुला ब्लडींग होतंय का?’ अशी विचारणा केल्याने तिच्या मनात शंकेची पालही चुकचुकली. मात्र वेदनेपुढे ती नाहीशीही झाली. त्या दरम्यान राहुरीत पोहोचलेल्या योगेश थोरातने रात्री दीडच्या सुमारास तिला अहमदनगरमधील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे सोनोग्राफी झाल्यानंतर तिला उपचारार्थ दाखल करुन घेण्यात आले. 1 ऑगस्ट रोजी संबंधित डॉक्टरांनी ‘तुमच्या पोटातील बाळ मयत झाले असून क्रिएटींग करावे लागेल’ असे सांगून पुढील कारवाई केली. मात्र तिच्या मनात शंका असल्याने तिने डॉक्टरांना बाळ का मयत झाले असे विचारले असता त्यांनी खूप दिवसांनी झालेली गर्भधारणा आणि वयाची शक्यता वर्तवली व हैद्राबादच्या प्रयोगशाळेत नमुने पाठवल्याचे सांगत अहवाल आल्यानंतर समजेल असे उत्तर दिले.


दुसर्‍या दिवशी तिला रुग्णालयातून सोडल्यानंतर योगेश थोरात तिला घेवून पुण्याला गेला व दोन दिवस तेथेच राहिला. त्यानंतर त्याने तिला संगमनेरकडे येणार्‍या बसमध्ये बसवून दिले व तो मात्र तेथेच थांबला. 18 ऑगस्ट रोजी त्या महिलेचे हैद्राबादला पाठवलेले अहवाल आल्याने ते दोघेही पुन्हा नगरला ‘त्या’ रुग्णालयात गेले. यावेळी डॉक्टरांनी ‘तुम्ही आई होवू शकता, फिट आहात’ असे सांगितले व त्यानंतर योगेश थोरातने तिला राहुरीत सोडून संगमनेर गाठले. मात्र या प्रकाराने त्या शिक्षिकेला सगळा उलगडा झाला व नारळ पाणी, दही या गोष्टीतून त्यानेच आपला गर्भपात घडवून आणल्याचेही तिच्या लक्षात आले. या सर्व प्रकारांनी मानसिक खच्ची झालेली ती शिक्षिका आजारी पडली.


त्यामुळे योगेश थोरात व त्याची आई दोघेही तिला भेटण्यासाठी राहुरीला गेले. यावेळी त्याच्या आईने ‘योगेश तुला 30 ऑगस्टला भेटण्यासाठी येईल’ असे सांगत ते दोघेही तेथून माघारी संगमनेरला आले. मात्र ठरल्या दिवशी तो आल्याने तिने त्याला फोन केला असता तो बंद होता. त्यानंतर 7 सप्टेंबरला तिने त्याच्या आईच्या मोबाईलवर फोन करुन आपणास योगेश सोबत बोलायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्या आईने त्याच्याकडे मोबाईल दिला असता तो म्हणाला; ‘तू मला त्रास देणार नसशील, माझ्यशी लग्नाचा हट्ट करणार नसशील तरच मी तुझ्याशी बोलेल’ असे म्हणत त्याने फोन बंद केला. या दरम्यान लोणावळ्यातील एका पोलिसाच्या मदतीने योगेश थोरात याने संबंधित शिक्षिकेचे फोन रेकॉर्डही काढले.

12 सप्टेंबर रोजी संगमनेरातील एका रुग्णालयात जाण्यासाठी ती संगमनेर बसस्थानकात पोहोचली. यावेळी योगेशचे आई व वडील यांची भेट झाली. त्यावेळी तीने आपणास योगेशला भेटायचे असल्याचे सांगताच काही वेळातच तो एका चारचाकी वाहनातून तेथे आला. यावेळी त्याच्यासोबत अन्य एक माणूस व महिला होती. वाहनातील त्या इसमाचे नाव गणेश शेंगाळ असल्याचे तिला समजले. त्यामुळे तिने गाडीत बसण्यास नकार दिला. त्यावर त्या दोघांनी तिला दमबाजी केली, शेंगाळ याने गाडीत बस नाहीतर येथेच मारुन टाकील म्हणून धमकी दिली, तर योगेशने हिला आधीच मारुन टाकायला हवे होते असे सांगत तिला बळजोरीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. तेथून ते ‘त्या’ रुग्णालयात गेले, काही दिवस रुग्णालयात उपचार घेतले मात्र या दरम्याने योगेशने तिच्याशी कधीही संपर्क केला नाही.

रुग्णालयात असताना तिला योगेश थोरात हा नालायक प्रवृत्तीचा शिक्षक असून त्याने आत्तापर्यंत 7 ते 8 महिलांसोबत असेच प्रकार केल्याचे व गर्भपाताच्या गोळ्याही शहरातील एका महिलेकडून आणल्याचे समजल्यावर याच्यापासून आपल्या जीवितास धोका असल्याचे ओळखून तिने मंगळवारी रात्री (ता.20) शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार शहर पोलिसांनी घुलेवाडीत राहणारा जिल्हा परिषदेचा शिक्षक योगेश अण्णासाहेब थोरात व त्याचा सहकारी गणेश शेंगाळ या दोघांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 376, 313, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्याकडे दिला आहे. या वृत्ताने संगमनेरच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून गुन्हा दाखल होताच तो नराधम शिक्षक पसार झाला आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.


सदरचा नराधम शिक्षक जिल्हा परिषदेच्या सायखिंडी येथील शाळेत कार्यरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदरील फिर्यादीमध्ये त्याने यापूर्वीही अशाच पद्धतीचे आमिष दाखवून सात ते आठ महिलांना फसवल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे त्याला अटक झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण क्षेत्रातून मोठे स्कँडलही समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशाप्रकारे कोणत्या महिलेची फसवणूक झाली असेल तर त्यांनी हिंमत करुन पुढे येण्याची गरज असून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील अशा विकृती नष्ट करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आली आहे.

Visits: 166 Today: 1 Total: 1595971

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *