राहुरी शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सव्वा चार लाखांचा ऐवज केला लंपास
नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरात मंगळवारी (ता.12) पहाटे तीन वाजेपर्यंत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. दोन घरफोड्या करुन, भर पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील संतोष ज्वेलर्स दुकान फोडले. तेथून साडेसहा किलो चांदीचे व 45 ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा 4 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. या प्रकरणी राहुरी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी सकाळी सात वाजता दुकानाच्या लाकडी फळ्या उघडलेले दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. ‘मिश्का’ नावाच्या श्वानाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत मार्ग काढला. याबाबत संतोष गोटीराम नागरे (वय 42, रा.राहुरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चांदीचे पैंजण, मुर्त्या, लहान मुलांचे कडे, जुनी चांदीची मोड असा साडेसहा किलो चांदीचा 2 लाख 34 हजारांचा ऐवज, तसेच सोन्याच्या मुरण्या, नथा, बाळ्या, खड्याचे टॉप्स असे एकूण 45 ग्रॅमचे 1 लाख 96 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
चोरट्यांनी शुक्लेश्वर मंदिर परिसरातील कासार गल्लीतील विजय विठ्ठलराव आकडे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली. आणि कपाटातील 10 हजार रुपये घेऊन चोर पसार झाले. याच परिसरातील सगळगिळे यांचे बंद घर चोरांनी फोडले. सगळगिळे बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घरातून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याची माहिती मिळाली नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.