माहुली घाटात कार उलटली; चौघे बालंबाल बचावले पुणे-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची श्रृंखला सुरूच

नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक या दोन महानगरांना जोडणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय दररोज हजारो वाहनांची रहदारी असते. परंतु, या महामार्गाची निर्मिती करणार्‍या संबंधित ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केल्याने गेल्या तीन-चार महिन्यांपासून अपघातांची श्रृंखला सुरू आहे. महामार्गावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना टोल भरुनही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचाच प्रत्यय मंगळवारी (ता.29) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आला. माहुली घाटात खड्ड्यांमुळे कारचा टायर फुटल्याने कार पलटी होत चौघे बालंबाज बचावले आहेत. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कारमधून (क्रमांक एमएच.12, एमआर.7255) नितीन मघाराम चौधरी, कुपाराम चौधरी, श्रीदेवी चौधरी, मघाराम चौधरी हे (सर्व मूळ रा.राजस्थान) हल्ली चाकण येथे वास्तव्यास आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री ते संगमनेरमार्गे चाकणला जात होते. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात आले असता कारचा टायर फुटून कार थेट पलटी झाली. या अपघातात कारमधील चौघांना किरकोळ दुखापत झाली. केवळ दैव बलवत्तर असल्याने चौघेही बालंबाल बचावले. मात्र, यात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

तत्पूर्वी गेल्या दोन-तीन दिवसांपासून महामार्गाची चाळण झाल्याच्या मथळ्याखाली माध्यमांनी प्रसिद्धी दिली होती. त्याची दखल घेत संबंधित ठेकेदार कंपनीने सुरुवातील मातीचा भरावा टाकून खड्डे बुजविण्याचा घाट घातला होता. या बाबीची माध्यमांनी पुन्हा दखल घेत दररोज वाहनांकडून लाखो रुपयांची टोल वसुली करणार्‍या कंपनीच्या चुकीच्या कामावर बोट ठेवले. त्यानंतर झोपेचे सोंग घेतलेल्या कंपनीने डांबर टाकून खड्डे बुजविण्यास सुरूवात केली आहे.

मंगळवारपासून महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. हे काम पूर्ण होण्यास साधारण चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. कारण, पावसाळा सुरू असल्याने कामात वारंवार व्यत्यय येत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी गतीवर नियंत्रण ठेवून वाहने चालविण्याची गरज आहे.

Visits: 211 Today: 1 Total: 1580534

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *