जनतेतून सरपंच निवडीचा भाजपलाच फटका राजूरमध्ये सत्ता भाजपची पण सरपंच राष्ट्रवादीचा

नायक वृत्तसेवा, अकोले
गावच्या सरपंचाची जनतेतून थेट निवड करण्याच्या निर्णयाचा फटका अकोले तालुक्यातील राजूर या महत्वाच्या गावात भाजपला बसला आहे. तेथे 17 पैकी 11 जागा जिंकत भाजपने सत्ता काबीज केली. मात्र, सरंपचपदी राष्ट्रवादीचा उमेदवार निसटत्या मतांनी विजयी झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे हे गाव आहे. तेथे पिचड आणि राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यात चुरशीची लढत झाली. महाविकास आघाडीच्या सरकारने सरपंचपद सदस्यांमधून निवडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तो रद्द करून पुन्हा जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत सुरू केली. त्यानुसार आता या निवडणुका झाल्या आहेत.

अकोले तालुक्यातील राजूर गावात डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पुष्पा निगळे या जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शोभा देशमुख यांचा अवघ्या 19 मतांनी पराभव केला. राजूर ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित जमाती महिला उमेदवारासाठी राखीव होते. यासाठी पुष्पा निगळे यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना ती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविली आणि 19 मतांनी विजयी झाल्या.

कमी मताधिक्य असल्याने फेरमोजणीची मागणी झाली. ती मान्य होऊन फेरमतमोजणी करण्यात आली. मात्र, निकालात काहीही फरक पडला नाही. या ग्रामपंचायतीत 17 जागा आहेत. त्यापैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीकडे सहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीत भाजपचे बहुतम झाले आहे. मात्र सरंपचपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. अशा परिस्थितीत आता कारभार कसा चालविला जाणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
