मोठी नावे वगळण्यासाठी तीस लाखांची तडजोड केली : कतारी अमरधाम प्रकरणी भाजपाचीच चौकशी करण्यासाठी पोलिसांना दिला तक्रार अर्ज..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या अमरधाम नूतनीकरण व सुशोभिकरणाच्या कामात झालेल्या निविदेच्या घोळात नगराध्यक्षांसह चार नगरसेवक व तीन अधिकार्‍यांवर सुरुवातीला आरोप आणि नंतर केवळ दोघा अधिकार्‍यांवर गुन्हे हे अनाकलनीय आहे. या प्रकरणात भाजपच्या संलग्न संघटनेचा एक पदाधिकारी सुरुवातीपासून असताना त्याला डावलून तीस लाखांची तडजोड केली गेली आणि सहा जणांना वाचवण्यात आल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणात लाचखोरी झाल्याचे सांगत त्याची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना अर्ज दिल्याची माहितीही दिली.

गेल्या शुक्रवारी मध्यरात्री अमरधाम निविदा घोटाळाप्रकरणी श्रीरामपूरचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी शहर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यात संगमनेर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील नगर अभियंता राजेंद्र सुतावणे व कनिष्ठ अभियंता सूर्यकांत गवळी या दोघांनाच आरोपी करण्यात आल्यावरुन संगमनेरात राजकीय वावटळं उठली आहेत. या प्रकरणात भाजपाच्या पदाधिकार्‍याने 30 लाखांची लाच घेतल्याचा आरोप शहर शिवसेनाप्रमुख अमर कतारी यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.19) शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख व उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब हासे दोघेही उपस्थित होते.

यावेळी बोलताना कतारी म्हणाले की, 2 मार्च 2022 रोजी पोलीस अधीक्षकांना भेटून संगमनेर भाजपाच्या शहराध्यक्षांनी संगमनेरमधील नगरसेवक, पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर आमदार निधी व नगरपरिषद फंडातून अमरधाम बांधकाम प्रकरणी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या गोष्टीला पाच महिने झाले तरीही सदर प्रकरणात कोणतीही कार्यवाही झाली नाही. याबाबत चर्चा सुरु असतांनाच फिर्यादी गटातीलच एकाने या प्रकरणात तीस लाख रुपयांची तडजोड झाल्याची कबुली आपल्याकडे केल्याचा दावा कतारी यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे स्थानिक भाजपचे बिंग फुटले असून संबंधित नाराज झालेल्या पदाधिकार्‍याने याबाबतची नाराजी 4 सप्टेंबर रोजी सोशल माध्यमातून व्यक्त केली होती.

सदरची नाराजी आपल्या निदर्शनास आल्यानंतर आपणच फोनवरुन त्या नाराज पदाधिकार्‍याशी संपर्क साधल्याचे कतारी यांनी सांगितले. सदरील व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नसून अमरधाम प्रकरणात सुरुवातीचे आंदोलन करणार्‍या भाजयुमोचा शहराध्यक्ष दीपेश ताटकर असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. सदरील व्यक्ती आपणास माहिती देत असली तरीही भविष्यात त्याने कोणाच्या दबावात येवून सांगितलेली माहिती नाकबूल करु नये यासाठी आपण त्याचे संभाषण रेकॉर्ड करुन घेतल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. यावेळी झालेल्या संभाषणात ताटकर यांनी अमरधाम भ्रष्टाचार प्रकरणात भाजपाच्या शहराध्यक्षांनी लाखो रुपये घेतले व सदर प्रकरणातून काही बड्या पदाधिकारी व नगरसेवकांची नावे वगळली आहेत. सदर गुन्ह्यात आठ जणांवर आरोप असताना केवळ दोघा अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती त्याने प्रत्यक्ष गुन्हा दाखल होण्याच्या 15 दिवस आधीच आपणास दिल्याचेही कतारी म्हणाले.

माहिती मिळाली त्याच दिवशी आपण सोशल माध्यमात भ्रष्टाचार प्रकरण दडपण्यासाठी अथवा आरोपींची नावे कमी करण्यासाठी 30 लाखांची तडजोड झाल्याची पोस्ट केली होती. सदर फिर्यादीपैकी एक असलेल्या दीपक ताटकर या व्यक्तीचा फोन संभाषणाचा वरीलप्रमाणे पुरावे आपल्याकडे असल्यामुळे आपली पूर्ण खात्री झाल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणातून मुख्य नावे वगळण्याच्या बदल्यात तीस लाख रुपयांची लाच घेऊन सदर प्रकरण दाबले जाणार हे समजल्यावर अभियंत्यांवर गुन्हे दाखल व्हायच्या आत आपण सदर प्रकरणाची सखोल माहिती घेतली, त्यातून आपणास असा प्रकार घडल्याची पूर्ण खात्री पटल्याने सदरचे प्रकरण पुढे जाण्याआधीच त्याची संपूर्ण चौकशी व्हावी अशी आपली मागणी आहे, त्यासाठी आपण शहर पोलिसांकडे तक्रार अर्जही दाखल केल्याचे कतारी यांनी सांगितले.

Visits: 13 Today: 1 Total: 82393

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *