म्हाळुंगीच्या वाहत्या पाण्यात साईबाबांची मूर्ती अवतरली..! आज गुरुवारी सकाळपासून एकाच ठिकाणी थांबून राहील्याने अनेकांनी घेतले दर्शन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘शिर्डीस ज्याचे लागतील पाय। टळती अपाय सर्व त्याचे॥’
श्री साई सच्चरित्रात सांगीतलेली साईबाबांची अकरा वचने म्हणजे मानवी जीवनातील आध्यात्मिक प्रवासच आहे. संस्कार आणि आध्यात्माच्या मार्गात प्रगती करु इच्छिणार्‍या मुमुक्षु जीवांचे एका अनन्य भक्तामध्ये रुपांतर होण्याची प्रक्रीया म्हणजे साईंची ही अकरा वचने आहेत. या प्रक्रीयेचा आरंभ होतो शिर्डीची वाट धरल्यानंतर. मात्र जर या उलट घडले तर..? आज गुरुवारच्या दिनी चक्क असे घडले आणि ते देखील संगमनेरात. म्हाळुंगीच्या वाहत्या पाण्यातही केळीच्या एका पानावर स्थिर विराजमान झालेली साईनाथांची धवलमूर्ती बाबांच्या भक्तांसाठी चमत्कारापेक्षा वेगळी नाही. हा प्रकार ज्यांना समजला, त्यांनी म्हाळुंगीच्या काठी जात बाबांच्या जलमय प्रतिमेसमोर हातच जोडले.


त्याचे झाले असे की, शहरातील काही पत्रकार मंडळी दररोज सकाळी अकोले रस्त्यावर पदभ्रमंतीसाठी जात असते. आजही नेहमीप्रमाणे दोघे-चौघे देवाचा मळाभागातून कानवडे हॉस्पिटलच्या मार्गाने भ्रमंती करुन सकाळी सातच्या सुमारास माघारी घराकडे निघाले होते. राजापूरकडे जाणार्‍या पुलावर ही मंडळी पोहोचली असता त्यातील एकाचे लक्ष म्हाळुंगीच्या वाहत्या पाण्यात तरंगणार्‍या एका शुभ्र मूर्तीवर खिळले. त्याने आपल्या इतर सहकार्‍यांना ही गोष्ट सांगीतली असता ते सगळेच पत्रकार पुलावर उभे राहुन ती मूर्ती न्याहाळु लागले तर ती चक्क साईनाथांची प्रतिमा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.


आज गुरुवार असल्याने त्यातील काहींनी मनोभावे नमस्कार करीत हे असं कसं शक्य आहे अशी विचारणा करायला सुरुवात केली. साधारण फुटभर उंचीची ही धवल मूर्ती केळीच्या एका पानावर विराजमान आहे. विशेष म्हणजे सदरची मूर्ती म्हाळुंगीवरील राजापूरकडे जाणार्‍या रस्त्यावरील पुलाजवळच अगदी खळाळत वाहत्या पाण्यातही अगदी स्थिर आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी बघितल्यानंतर हा प्रकार चमत्कारापेक्षा निश्‍चितच कमी नाही. मात्र केवळ एका पानाच्या आधारावर भल्या सकाळपासून अजूनपर्यंत ती एकाच ठिकाणावर स्थिर आहे, न हलता, न सरकता आणि न डगमगता हा मात्र चमत्कारच आहे अशी साईभक्तांची भावना आहे.


पुलाजवळ म्हाळुंगीचे पात्र काहीसे उथळ आहे, त्यामुळे अत्यंत कमी पाणी असलेल्या पाण्याखालील एका छोट्याशा टेकाडावर कदाचित ती मूर्ती रुतून बसली असावी. मात्र श्रद्धेला फक्त निमित्ताची जोड असायला हवी असं म्हणतात, त्याप्रमाणे हा प्रकार ज्यांना समजला त्यांनी श्रद्धेपोटी म्हाळुंगी नदीजवळील कानवडे हॉस्पिटल समोरच्या राजापूर पुलावर जावून बाबांचे दर्शन घेवून मानसिक समाधान प्राप्त केले. ते म्हणतात ना, श्रद्धेला कोणतेही मोल नसते. याचीच प्रचिती आज राजापूरच्या पुलावर मिळत आहे.

Visits: 105 Today: 1 Total: 1105117

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *