मुकादमास मारहाण करून पाच लाखांना लूटले

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील कणगर येथे ऊसतोड कामगारांना घेण्यासाठी आलेल्या मुकादमावर १५ ते २० जणांनी सामूहिक हल्ला करून तब्बल पाच लाखांची लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अनिल भास्कर देवरे (रा.देवकी, ता. गेवराई, जि. बीड) हे मजूर पुरवठा करणारे मुकादम आहेत. साखर कारखान्यांना ते कामगार उपलब्ध करून देतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी तालुक्यातील कणगर गावात १६ जणांना कामावर घेण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये दिले होते. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी पुन्हा पैसे देऊन कामगारांना कामावर येण्यास सांगितले. देवरे हे कामगारांशी करार करून त्यांना घेण्यासाठी कणगर येथे पोहोचले असता, आरोपींनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. देवरे यांनी गाडीमध्ये साहित्य ठेवून झाल्यानंतर पैसे देऊ, असे सांगितल्यावर आरोपी भडकले. त्यांनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्यांनी व दगडांनी मारहाण केली.

त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर दगडफेक करून नुकसान केले. त्यानंतर आरोपींनी देवरे यांच्याजवळील ४ लाख ९० हजार रुपयांची रोकड, हातातील चांदीचे ब्रेसलेट, मोबाईल, तसेच संगीता वाघमारे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, असा एकूण ५ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल लुटून नेला. याप्रकरणी देवरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी शाम धोंडीराम बर्डे, भारत रघुनाथ माळी, सुदाम चंदू बर्डे, संजय जालींदर बर्डे, जालिंदर धोंडीराम बर्डे, राजू लक्ष्मण बर्डे, अर्जुन नामदेव पवार, लक्ष्मण पवार, मधू बर्डे, विश्वनाथ बर्डे, मच्छिंद्र ऊर्फे रोहित गोविंद बर्डे, राजू किसन बर्डे, गणेश गोविंद बर्डे, मारुती पवार, अजय मारुती पवार यांच्यासह इतर महिला व पुरुष अशा एकूण सुमारे वीस जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Visits: 70 Today: 2 Total: 1108859
