मुस्लिम मुलीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाचे अपहरण भोकर येथील घटना; तरुणाच्या कुटुंबियांना घातपाताचा संशय

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
लव्ह जिहादच्या प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या श्रीरामपूरमध्ये आता आणखी एक घटना घडली आहे. एका हिंदू तरुणाने मुस्लिम मुलीशी लग्न केले म्हणून त्याचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याचा घातपात झाल्याचा संशयही कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असले तरी त्या तरुणाचा अद्याप तपास लागलेला नाही.

हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण विधीमंडळातही गाजले होते. याप्रकरणी मुल्ला कटर याच्यासह आणखी काही आरोपींना अटक झाली आहे. पोलीस अधिकार्‍यांनाही निलंबित करून चौकशी सुरु आहे. हा प्रश्न विधानसभेत मांडताना आमदार नीतेश राणे यांनी हिंदू मुलींचे धर्मांतर घडवून विवाह करण्यासाठी मुस्लिम तरुणांना पैसा पुरविला जात असल्याचा आरोप केला होता.

त्याच दरम्यान आता आणखी एक वेगळ्या प्रकारचे प्रकरण समोर आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे याच्या बाबतीत ही घटना घडली आहे. त्याचे एका मुस्लिम युवतीसोबत प्रेम होते. मुलीच्या घरच्यांचा याला विरोध होता. तरीही त्या दोघांनी परस्पर लग्न केले. याची माहिती मुलीच्या घरच्यांना कळाल्यावर त्यांनी दीपकला मारहाण केली. त्याच्या ताब्यातून त्या मुलीला घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी तिला पुण्याला आपल्या मामाकडे ठेवले. याची माहिती मिळाल्यावर दीपक दुसर्‍या कामाच्या निमित्ताने मित्रांसोबत पुण्याला गेला. तेथे गेल्यावर मुलीच्या मामाने दीपकला मारहाण करत अपहरण केले, असा आरोप त्याच्या मित्रांनी केला आहे. त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मजून शेख, इम्रान अब्बास शेख, समीर अहमद शेख, अजित शेख यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकराला आठ दिवस झाले, तरीही अद्याप तरुणाचा तपास लागला नाही. त्यामुळे दीपकच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

Visits: 70 Today: 2 Total: 430650

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *