वारकरी संप्रदाय हा मानवता धर्म शिकविणारा ः थोरात श्री क्षेत्र कोकमठाण येथील गंगागिरी महाराज सप्ताहाला भेट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांपासून विविध संतांची मोठी परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाने भेदभावाला थारा न देता मानवता धर्म वाढीची शिकवण दिली आहे. हीच परंपरा गंगागिरी महाराज सप्ताहातून जपली जात असल्याने लाखो भाविकांचा हा अखंड हरिनाम सप्ताह श्रद्धास्थान असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री व काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहात सातव्या दिवशी सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांच्या प्रवचन सेवाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, विवेक कोल्हे, स्नेहलता कोल्हे, नवनाथ महाराज आंधळे, आकाश नागरे, तुषार पोटे, सुभाष सांगळे, सचिन दिघे, सचिन खेमनर, विठ्ठल असावा, विक्रम दंडवते, मधु महाराज आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार थोरात म्हणाले, वारकरी संप्रदायाला हजारो वर्षांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखामेळा, संत गोरा कुंभार अशी विविध संतांची मांदियाळी या संप्रदायात आहे. वारकरी संप्रदाय हा साधाभोळा धर्म आहे. कपाळी बुका आणि हरीनामाचा जागर हा सोपा अध्यात्माचा मंत्र या पंथामध्ये आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या संप्रदायाने मानवतेचा धर्म शिकवला आहे. या पंथामध्ये लहान-मोठा अशा कोणताही भेद नसतो. या व्यासपीठावर सर्वजण एकत्र येतात. राजकारण बाजूला ठेवून सर्व एकत्र असतात किंबहुना अंतकरण शुद्ध करण्याचे हे व्यासपीठ आहे. याप्रसंगी महंत रामगिरीजी महाराज यांचे हरीप्रवचन झाले. लाखो भाविकांनी याचा लाभ घेतला.

थोरात कारखान्याची मदत..
आमदार बाळासाहेब थोरात यांची सराला बेट आणि या सप्ताहावर नितांत श्रद्धा आहे. दरवर्षी या सप्ताहात अमृत उद्योग समूह व थोरात कारखान्याची मोठी मदत असते. यावर्षीही चिवड्यासाठीचा महाप्रसाद, आमटी बनवण्याचे यंत्र, बुंदी सुकविण्याची यंत्रणा यांसह विविध मदतीही सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने पुरविल्या आहेत.

Visits: 190 Today: 2 Total: 1954662

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *